राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर पंतप्रधान मोदी यांची भावूक पोस्ट लिहिली आहे. त्यांनी अजित दादांसोबतचा फोटो शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं बारामतीमध्ये विमान अपघातात निधन झालं. त्यांच्या जाण्याने संपूर्ण राज्यभरात शोककळा पसरली असून कार्यकर्ते, नेते यांना अश्रू अनावर झाले आहेत. अजित पवारांसह विमान अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. अजित पवारांच्या निधनावर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पंतप्रधान मोदी यांनी एक्सवर अजित दादांसोबतचे फोटो पोस्ट करत भावूक प्रतिक्रिया दिली आहे.
‘श्री अजित पवार जी हे जनतेशी घट्ट नाते असलेले, तळागाळाशी मजबूत नाळ असलेले लोकनेते होते. महाराष्ट्रातील जनतेच्या सेवेत सदैव अग्रभागी राहणारे एक मेहनती व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांना व्यापक आदर होता. प्रशासकीय बाबींची त्यांना सखोल जाण होती. गरीब आणि वंचितांच्या सक्षमीकरणासाठीची त्यांची तळमळ विशेष उल्लेखनीय होती. त्यांचे अकाली निधन अत्यंत धक्कादायक व दुःखद आहे. त्यांच्या कुटुंबीयांप्रती आणि असंख्य चाहत्यांप्रती मनःपूर्वक शोकसंवेदना. ॐ शांती.’







