नवी दिल्ली, २५ : भारताच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त देशातील पोलीस, अग्निशमन, होमगार्ड आणि सुधारात्मक सेवेतील एकूण ९८२ अधिकारी व कर्मचाऱ्यांना शौर्य आणि सेवा पदके जाहीर करण्यात आली आहेत. महाराष्ट्रातील एकूण ८९ अधिकारी व कर्मचारी यांना विविध क्षेत्रातील कामगिरीसाठी पुरस्कार जाहीर झाले आहेत. यामध्ये ३१ पोलीस कर्मचाऱ्यांना ‘वीरता पदक’ (GM), उत्कृष्ट आणि विशिष्ट सेवेसाठी दिले जाणारे ‘राष्ट्रपती पदक’ (PSM) पोलीस दलातील ४ अधिकारी आणि सुधारात्मक सेवा विभागातील २ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. उल्लेखनीय सेवेसाठी (MSM) महाराष्ट्रातील पोलीस सेवेतील ४०, अग्निशमन सेवेसाठी ४, नागरी संरक्षण व होमगार्ड सेवेतील ३, सुधारात्मक सेवेतील ५ या अधिकारी-कर्मचाऱ्यांना पुरस्कार जाहीर करण्यात आले.
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय गृहमंत्रालयामार्फत दरवर्षी पोलीस, अग्निशमन, होमगार्ड आणि सुधारात्मक सेवेतील कार्यासाठी शौर्य आणि सेवा पदके दिली जातात.







