प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारकडून देशातील सर्वोच्च नागरी सन्मानांपैकी एक असलेल्या पद्म पुरस्कारांची २०२६ साठी घोषणा करण्यात आली. केंद्रीय गृहमंत्रालयाने जाहीर केलेल्या यादीत कला, क्रीडा, विज्ञान, व्यापार, उद्योग, वैद्यकीय, कृषी व समाजसेवा अशा विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय योगदानासाठी एकूण १३१ मान्यवरांचा सन्मान करण्यात येणार आहे.
या यादीत महाराष्ट्रातील १५ मान्यवरांचा समावेश असून राज्याला यंदा एक पद्मविभूषण, तीन पद्मभूषण आणि ११ पद्मश्री पुरस्कार मिळाले आहेत. हे सर्व पुरस्कार येत्या मार्च-एप्रिल महिन्यात राष्ट्रपती भवनात आयोजित विशेष सोहळ्यात राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहेत.
दरम्यान, हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र सिंह देओल यांना त्यांच्या दीर्घकालीन व भरीव योगदानाबद्दल मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
पद्मभूषण पुरस्कारार्थी (महाराष्ट्र)
महाराष्ट्रातील तीन मान्यवरांची पद्मभूषणसाठी निवड झाली आहे. त्यामध्ये –
अलका याज्ञिक – प्रसिद्ध पार्श्वगायिका (कला)
पीयूष पांडे – जाहिरात क्षेत्रातील दिग्गज (मरणोत्तर – कला)
उदय कोटक – बँकिंग व वित्त क्षेत्र (व्यापार व उद्योग)
पद्मश्री पुरस्कारार्थी (महाराष्ट्र)
पद्मश्री पुरस्कारासाठी महाराष्ट्रातील ११ मान्यवरांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. त्यामध्ये –
रोहित शर्मा – क्रिकेटपटू (क्रीडा)
श्रीमती आर्मिडा फर्नांडिस – वैद्यकीय क्षेत्र
जनार्दन बापूराव बोथे – समाजसेवा
श्रीरंग देवाबा लाड – कृषी
भिकल्या लाडक्या धिंडा – कला
माधवन रंगनाथन – कला
रघुवीर तुकाराम खेडकर – कला
सतीश शाह – (मरणोत्तर) कला
अशोक खाडे – व्यापार व उद्योग
सत्यनारायण नुवाल – व्यापार व उद्योग
जुझेर वासी – विज्ञान व अभियांत्रिकी
या मान्यवरांच्या कार्यामुळे महाराष्ट्रासह देशाचा नावलौकिक वाढला असून सर्व स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत आहे.







