श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त येत्या २४ व २५ जानेवारी २०२६ रोजी नांदेड येथे आयोजित करण्यात येणाऱ्या “हिंद दी चादर” या भव्य व ऐतिहासिक कार्यक्रमाच्या व्यापक प्रचार-प्रसिद्धीसाठी जिल्हाभर जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत शालेय स्तरावर विविध स्पर्धा, माहितीपट, चित्रफीत व सांस्कृतिक सादरीकरणांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये जागृती निर्माण केली जात आहे.
या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये निबंध, चित्रकला, वक्तृत्व, गायन स्पर्धा तसेच “हिंद दी चादर” विषयावरील डॉक्युमेंट्री, चित्रपट व गीतांचे सादरीकरण करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या त्याग, बलिदान, धर्मनिष्ठा व मानवतेच्या मूल्यांचा संदेश देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
या अनुषंगाने लोहा तालुक्यातील पेनूर येथील जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये चित्रकला व निबंध स्पर्धा घेण्यात आल्या असून विद्यार्थ्यांना माहितीपटही दाखविण्यात आला.
कंधार तालुक्यातील फुलवळ केंद्रांतर्गत जि.प. शाळांमध्ये चित्रकला व भाषण स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.
तसेच जि.प. प्राथमिक शाळा जैतापूर व रहाटी बु. येथे “हिंद दी चादर” माहितीपट विद्यार्थ्यांना दाखविण्यात आला.
जि.प. केंद्र प्राथमिक शाळा चिखली, कौठा तसेच जि.प. कन्या शाळा कौठा (ता. कंधार) येथील विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या असून चित्रफितीच्या माध्यमातून श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या महान कार्याची माहिती देण्यात आली.
याशिवाय जि.प. नवीवाडी, जि.प. प्राथमिक शाळा बळीरामपूर (केंद्र वसरणी), जि.प. प्राथमिक शाळा ब्राह्मणवाडा व जिल्हा परिषद हायस्कूल भायेगाव येथे “हिंद दी चादर” गीत व व्हिडिओ विद्यार्थ्यांना दाखविण्यात आला.
जि.प. प्राथमिक शाळा काकांडी येथे टीव्हीच्या माध्यमातून गीत व कथासादरीकरण झाले, तर जि.प. नागापूर व जि.प. प्राथमिक शाळा तुप्पा येथे विद्यार्थ्यांना “हिंद दी चादर” चित्रपट दाखविण्यात आला.
या कार्यक्रमाच्या प्रचारासाठी १५ ते २३ जानेवारी २०२६ दरम्यान प्रभातफेरीचे आयोजन करण्यात आले असून, २५ जानेवारीपर्यंत शाळांमधील परिपाठाच्या वेळी श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या कार्यावर आधारित गीतांचे सादरीकरण, डॉक्युमेंटरी प्रदर्शन तसेच
“हिंद दी चादर – श्री गुरु तेग बहादुर” या घोषवाक्याचा प्रसार करण्याच्या सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत.
दरम्यान, १५ ते १७ जानेवारी २०२६ दरम्यान तालुकास्तरीय स्पर्धा (चित्रकला, गायन, निबंध व वक्तृत्व) घेण्यात येणार असून,
जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा २० जानेवारी २०२६ रोजी
गुरु ग्रंथसाहेबजी भवन, सचखंड पब्लिक स्कूलजवळ, हिंगोली गेट, नांदेड येथे होणार आहे.
या स्पर्धांमध्ये सहभागी विद्यार्थ्यांना जिल्हास्तरावर प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मुख्य कार्यक्रमाच्या वेळी मा. मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार असून, सहभागी सर्व विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र दिले जाणार आहे.
“हिंद दी चादर” कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर आजपासून विद्यार्थ्यांच्या प्रभातफेरीद्वारे जिल्हाभर जनजागृती मोहीम सुरू करण्यात आली असून, या उपक्रमाला शाळा, आश्रमशाळा व महाविद्यालयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.




