मालवण (प्रतिनिधी) :
शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख देवदत्त उर्फ दत्ता सामंत यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून महायुतीच्या कार्यालयात शहरातील महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या पाककला स्पर्धेत रोहिणी तायशेटे यांनी प्रथम क्रमांक पटकावला. “तांदळापासून पौष्टिक पदार्थ” या संकल्पनेवर आधारित या स्पर्धेला महिलांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या स्पर्धेत शहरातील अनेक महिलांनी सहभाग नोंदवत तांदळापासून तयार केलेले विविध रुचकर व आरोग्यदायी पदार्थ सादर केले. चव, सादरीकरण आणि पौष्टिक मूल्य या निकषांवर परीक्षकांनी परीक्षण केले. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या स्पर्धेत संगीता तायशेटे यांनी द्वितीय, तर सुचित्रा सावंत यांनी तृतीय क्रमांक पटकावला. या स्पर्धेचे परीक्षण स्मृती कांदळकर आणि विनय गावकर यांनी केले.

या कार्यक्रमाला नगराध्यक्षा ममता वराडकर यांच्यासह नगरसेविका पूनम चव्हाण, शर्वरी पाटकर, नीना मुंबरकर, अश्विनी कांदळकर, स्वप्नाली नेरुरकर, मधुरा तुळसकर, प्रमिला मोरजे तसेच शिवसेना महिला पदाधिकारी व मोठ्या संख्येने महिला स्पर्धक उपस्थित होत्या.
स्पर्धेतील विजेत्यांना शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. यावेळी बोलताना सामंत यांनी महिलांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले आणि सर्व सहभागी स्पर्धकांचे मनापासून कौतुक केले.





