मालवण, दि. प्रतिनिधी :
मालवण येथील ऐतिहासिक राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा पाहण्यासाठी दररोज हजारो पर्यटक भेट देत आहेत. मात्र, किल्ल्याच्या परिसरात स्वच्छतागृहांची सुविधा नसल्याने पर्यटकांची मोठी गैरसोय होत होती. ही बाब लक्षात घेऊन नगरसेवक सहदेव बापर्डेकर यांनी तत्परतेने पुढाकार घेत येथे बायो टॉयलेटची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
राजकोट किल्ल्यावर येणाऱ्या पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, विशेषतः महिला व ज्येष्ठ नागरिकांना स्वच्छतागृहाअभावी मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. स्थानिक नागरिक तसेच पर्यटकांनी ही समस्या नगरसेवक सहदेव बापर्डेकर यांच्या निदर्शनास आणून दिली होती. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्यांनी नगरपरिषद स्तरावरून बायो टॉयलेट मंजूर करून घेतले.
केवळ मंजुरीपर्यंत मर्यादित न राहता, नगरसेवक बापर्डेकर यांनी स्वखर्चाने आणि स्वतः लक्ष घालून बायो टॉयलेटची जोडणी व आवश्यक ती सर्व व्यवस्था पूर्ण करून घेतली. त्यामुळे आता किल्ल्यावर येणाऱ्या पर्यटकांना तातडीने स्वच्छतागृहाची सुविधा मिळू लागली आहे.
ऐतिहासिक वारसा पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना मूलभूत सुविधा उपलब्ध झाल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले आहे. जनसामान्यांच्या प्रश्नांवर तातडीने उपाययोजना केल्याबद्दल नगरसेवक सहदेव बापर्डेकर यांचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, पर्यटकांनीही त्यांचे आभार मानले आहेत.





