मालवण, दि. प्रतिनिधी :
मालवण शहरातील सोमवार पेठ येथील स्मशानभूमीची दुरवस्था लक्षात घेऊन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तडफदार नगरसेवक मंदार ओरसकर यांनी स्वखर्चाने या ठिकाणी विद्युत रोषणाईचे काम पूर्ण केले आहे. त्यामुळे अनेक दिवसांपासून अंधारात असलेली स्मशानभूमी आता लख्ख प्रकाशाने उजळली असून नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
स्मशानभूमी परिसरात रात्रीच्या वेळी वावरताना अंधारामुळे नागरिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत होता. ही समस्या लक्षात घेत नगरसेवक ओरसकर यांनी सामाजिक बांधिलकी जपत स्वखर्चातून आवश्यक विद्युत दिवे व व्यवस्था कार्यान्वित केली. त्यांच्या या उपक्रमामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
याशिवाय दांडी आवारवाडी परिसरातील रखडलेले हायमास्ट दिव्यांचे कामही नगरसेवक ओरसकर यांनी विशेष पाठपुरावा करून मार्गी लावले आहे. हे काम यशस्वीरीत्या पूर्ण होण्यासाठी स्थानिक कार्यकर्ते व सहकाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. यामध्ये बबन वाघ, भावेश बटाव आणि रोशन कांबळी यांनी सक्रिय सहभाग नोंदवत काम पूर्णत्वास नेले.
नगरसेवक मंदार ओरसकर यांच्या तत्परतेमुळे आणि विकासाभिमुख कामांमुळे सोमवार पेठ तसेच दांडी परिसरातील रहिवाशांनी त्यांचे विशेष आभार मानले आहेत.





