जागतिक दिव्यांग दिनाच्या निमित्ताने सिंधुदुर्ग साईकृपा अपंगशक्ती बहुउद्देशीय शिक्षण संस्था, कसाल यांच्या वतीने विविध पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. समाजातील दुर्बल, गरजू व उपेक्षित घटकांसाठी निःस्वार्थ भावनेने कार्य करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांचा गौरव व्हावा या उद्देशाने देण्यात येणारा जिल्हास्तरीय आदर्श सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार यंदा प्रसन्ना उर्फ बाळू देसाई यांना प्रदान करण्यात आला.
या प्रसंगी प्रसन्ना देसाई यांचा सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र, शाल व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. सामाजिक क्षेत्रात त्यांनी दिलेले उल्लेखनीय योगदान, विशेषतः अपंग व्यक्ती, आर्थिकदृष्ट्या दुर्बल व सामाजिकदृष्ट्या मागास घटकांच्या उन्नतीसाठी केलेले कार्य याची दखल घेत हा पुरस्कार प्रदान करण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले.
पुरस्कार स्वीकारताना प्रसन्ना देसाई यांनी आपल्या समाजसेवेतील अनुभव कथन केले. सामाजिक कार्य हे केवळ मदतीपुरते मर्यादित न राहता समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचले पाहिजे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. समाजसेवेच्या माध्यमातून सकारात्मक परिवर्तन घडविणे हेच आपल्या कार्याचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी नमूद केले.
या सन्मान सोहळ्यास विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. यामध्ये श्री. सुनील घाग (खानोली), श्रीमती स्वरूपा संजय वसरगावकर (वेंगुर्ला), श्री. शामसुंदर नारायण लोट (भडगाव–कुडाळ), श्री. प्रकाश तुकाराम वाघ (तरदळे–कणकवली) आणि श्री. ललित गावडे (कसाल) यांचा समावेश होता. मान्यवरांनी आपल्या मनोगतातून प्रसन्ना देसाई यांच्या कार्याचे कौतुक करत त्यांच्या कार्यामुळे समाजात सकारात्मक बदल घडत असल्याचे सांगितले.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष अनिल शिंगाडे यांनी सिंधुदुर्ग साईकृपा अपंगशक्ती बहुउद्देशीय शिक्षण संस्था, कसाल ही संस्था अपंगशक्ती व्यक्तींच्या शिक्षण, प्रशिक्षण, पुनर्वसन व समाजमुखीकरणासाठी सातत्याने कार्यरत असून समाजात संवेदनशीलता निर्माण करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करत असल्याचे नमूद केले.
प्रेरणादायी वातावरणात कार्यक्रमाचा समारोप झाला असून या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.






