कुडाळ (प्रतिनिधी)
कासार्डे येथील १९ वर्षीय युवती कु. कस्तुरी पाताडे हिचा कणकवली येथील नागवेकर हॉस्पिटलमध्ये चुकीच्या पद्धतीने करण्यात आलेल्या शस्त्रक्रियेमुळे मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर रविवारी दि. २१ डिसेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता कुडाळ शहरात सजग नागरिकांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत मृत युवतीला श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार असून डॉक्टरांच्या कथित अनागोंदी कारभाराविरोधात सविस्तर चर्चा होणार आहे.
या प्रकरणानंतर हॉस्पिटलमधील डॉक्टर व कर्मचाऱ्यांकडून मयताच्या नातेवाईकांशी उद्धटपणे वागण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता. यानंतर उस्फूर्त जनउद्रेक होत हॉस्पिटलची किरकोळ तोडफोड झाली होती. या घटनेच्या निषेधार्थ जिल्ह्यातील खाजगी डॉक्टरांनी आपली ओपीडी सेवा बंद ठेवून आंदोलन केले होते. या सर्व संवेदनशील घडामोडींवर सामाजिक व कायदेशीर पातळीवर मार्ग काढण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली आहे.
ही बैठक कुडाळ येथील श्री गणपती मंदिर, कोर्टाच्या बाजूला आयोजित करण्यात आली असून या बैठकीस जागरूक व सजग नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.







