मालवण (प्रतिनिधी):
“आधुनिक विज्ञान व तंत्रज्ञानाचा उपयोग कृषी आणि औद्योगिक क्षेत्राच्या प्रगतीसाठी व्हावा. विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासत प्रगतीचा ध्यास धरावा,” असे प्रतिपादन भरतगड इंग्लिश मिडियम स्कूल, मसुरे येथे मालवण तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी अध्यक्षस्थानावरून बोलताना श्री. संग्राम प्रभूगावकर यांनी केले.
तालुकास्तरीय या विज्ञान प्रदर्शनाच्या उद्घाटन सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून मालवण तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी श्री. संजय माने, डॉ. सुधीर मेहेंदळे, डॉ. अनिरुद्ध मेहेंदळे, संदीप हडकर, मसुरे एज्युकेशन सोसायटी मुंबई लोकल कमिटी अध्यक्ष राजन परब, केंद्रप्रमुख नारायण देशमुख, मुख्याध्यापिका संतोषी मांजरेकर, तसेच संस्था पदाधिकारी राजन परब, संतोष सावंत, सन्मेश मसुरेकर, जगदीश चव्हाण, प्रशांत पारकर, देऊ जंगले, श्रीकृष्ण सावंत, शीतल माडये, नंदकिशोर गोसावी, तालुक्यातील शिक्षक, संस्था सभासद आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी गटशिक्षणाधिकारी श्री. संजय माने म्हणाले, “विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करताना त्यातील बारकावे समजून घ्यावेत. कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वापर करायला शिकणे ही काळाची गरज आहे. मालवण तालुक्यातील ग्रामीण भागात गुणवत्ता उत्तम असून त्या गुणवत्तेला योग्य दिशा देण्याचे काम शिक्षक तसेच विज्ञान मंडळ समर्थपणे करत आहे.”
या प्रदर्शनात प्राथमिक विभागातून 30, माध्यमिक विभागातून 28, तर दिव्यांग विद्यार्थी गटातून 7 प्रतिकृती मांडण्यात आल्या. याशिवाय वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, प्रश्नमंजुषा स्पर्धा, तसेच शिक्षक व परीचर निर्मित साहित्य स्पर्धा आयोजित करण्यात आल्या.
प्रदर्शनाच्या संयोजनाची जबाबदारी भरतगड इंग्लिश मिडियम स्कूलच्या सर्व शिक्षक, संस्था पदाधिकारी आणि पालकांनी उत्तम रीतीने पार पाडली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सायली म्हाडगुत यांनी केले, तर आभार प्रदर्शन संतोषी मांजरेकर यांनी मानले.







