कोकणातील प्रसिद्ध देवस्थान कांदळगावचे ग्रामदैवत स्वयंभू श्री देव रामेश्वर आपल्या वारेसूत्र, तरंग व रयतेसह छत्रपती शिवाजी महाराज आणि कुलस्वामिनी आदिमाया भवानी माता यांच्या ऐतिहासिक त्रैवार्षिक भेट सोहळ्यासाठी किल्ले सिंधुदुर्ग येथे २३ ते २५ जानेवारी २०२६ दरम्यान रवाना होणार आहेत. या पवित्र आणि पारंपरिक शिवकालीन इतिहासाचे साक्षीदार होण्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन श्री देव रामेश्वर देवस्थान विश्वस्त मंडळाने केले आहे.
कांदळगाव देवस्थानात देवस्थान ट्रस्ट, स्थानिक मानकरी, मालवण व्यापारी, जोशी मांड, रामेश्वर मांड, महान, न्हिवे, कोळंब तसेच किल्ले सिंधुदुर्ग रहिवाशी यांच्या संयुक्त बैठकीत भेट सोहळ्याचे नियोजन करण्यात आले. यावेळी २३ ते २५ जानेवारी या काळात श्री देव रामेश्वर रयत–लवाजम्यासह किल्ले सिंधुदुर्गवर जाणार असल्याचे निश्चित करण्यात आले. पुढील तयारीसाठी लवकरच आणखी एक बैठक होणार असल्याचेही सांगण्यात आले.
हा त्रैवार्षिक भेट सोहळा छत्रपती शिवाजी महाराज आणि श्री देव रामेश्वर यांच्यातील ऐतिहासिक अध्यात्मिक संबंधाची जिवंत परंपरा आहे. किल्ले सिंधुदुर्ग बांधकामाच्या वेळी महाराजांना समुद्राच्या लाटांमुळे येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी श्री देव रामेश्वरांनी दृष्टांतातून मार्गदर्शन केले होते. त्यांच्या सांगण्यावरून कांदळगाव येथे स्वयंभू शिवलिंगाचा जीर्णोद्धार करून महाराजांनी घुमट उभारला. त्यानंतर किल्ल्याचे बांधकाम सुरळीत पार पडले. याच ऐतिहासिक घटनेची सदिच्छा स्मृती म्हणून आजही “छत्रपतींचा वड” तेथे दिमाखात उभा आहे.
किल्ल्यावर आगमन झाल्यानंतर देव रामेश्वरांचे स्वागत सापकाळ मानकरी परिवाराकडून केले जाते. छत्रपतींसारख्या राजमान्य परंपरेनुसार देवतांना शेले–पागोटे देऊन नजराणा अर्पण केला जातो. त्यानंतर देव रामेश्वर संपूर्ण किल्ल्यावरील मंदिरांना भेट देतात व भवानी मातेसह आशीर्वादाचा अद्भुत सोहळा साकारतो.
या कालावधीत कांदळगाव व मालवण तालुक्यातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने सोहळ्यात सहभागी होतात. देव रामेश्वरांच्या मार्गावर सुंदर सडा–रांगोळ्या, तोरणे, स्वागत कमानी, पारंपरिक देखावे उभारले जातात. हा सोहळा मालवण तालुक्यासाठी केवळ धार्मिक नित्यकर्म नसून, एक महान सांस्कृतिक उत्सव मानला जातो.
या वर्षीचा त्रैवार्षिक सोहळा २३ ते २५ जानेवारी २०२६ दरम्यान आयोजित करण्यात आला असून, सर्व भाविक भक्तांनी सहभागी होऊन या ऐतिहासिक परंपरेचा मान राखावा, असे आवाहन श्री देव रामेश्वर देवस्थान विश्वस्त मंडळाने केले आहे.







