आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिनाचे औचित्य साधत मालवण शहरातील समाजसेवा, वैद्यक आणि सामाजिक संघटनांमध्ये बहुमूल्य योगदान देणारे ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. सुभाष मधुकर दिघे यांचा ह्यूमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन मालवण तालुका संघटनेच्या वतीने सन्मान करण्यात आला. सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष सुधीर धुरी यांच्या हस्ते डॉ. दिघे यांना सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
डॉ. दिघे यांनी मुंबई येथे वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यानंतर 1969–1971 या काळात आचरा येथे वैद्यकीय अधिकारी म्हणून सेवा सुरू केली. त्यानंतर 1976 पासून त्यांनी मालवणमध्ये वैद्यकीय व्यवसायाला प्रारंभ केला. रात्री-अपरात्रीही गरजू रुग्णांसाठी तत्पर सेवा देत असंख्य रुग्णांचे प्राण वाचविण्याचे मोलाचे कार्य त्यांनी केले आहे.
वैद्यकीय क्षेत्राबरोबरच सामाजिक आणि राष्ट्रीय कार्यातही त्यांचे योगदान उल्लेखनीय आहे. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघ रत्नागिरी विभाग संघचालक, तसेच कोकण प्रांत सेवा प्रमुख म्हणून कार्यरत राहिले. मालवण येथील शिवाजी वाचन मंदिर तसेच मालवण तालुका ज्येष्ठ नागरिक संघ या संस्थांचे अध्यक्ष म्हणून त्यांनी उल्लेखनीय कार्य केले. माणगाव येथील डॉ. हेडगेवार प्रकल्प संस्थेचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी महत्त्वाची कामगिरी बजावली. अणाव येथील आनंद वृद्धाश्रम येथेही ते मार्गदर्शक म्हणून सतत सेवा देत होते.
त्यांच्या चतुरस्त्र आणि प्रदीर्घ सेवाकार्यातील योगदानाची दखल घेत संघटनेने मानवाधिकार दिनानिमित्त हा विशेष सन्मान आयोजित केला.
यावेळी कार्यक्रमास सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष सुधीर धुरी, मालवण तालुकाध्यक्ष प्रमोद कांडरकर, उपाध्यक्ष महेश मयेकर, उपाध्यक्ष संग्राम सिंह पवार, निरीक्षक संदेश फाटक, महिला संघटक मुक्ता रजपूत, श्री. ढोलम आदी मान्यवर उपस्थित होते.







