मालवण येथील बॅ. नाथ पै सेवांगणतर्फे प्रदान केला जाणारा कै. मधु वालावलकर समाजसेवक पुरस्कार यंदा वराड-भंडारवाडी (ता. मालवण) येथील समाजसेवक विद्याधर चिंदरकर यांना प्रदान करण्यात आला. वराड भंडारवाडी येथील महापुरुष मंदिरात आयोजित पुरस्कार सोहळ्यात शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, सन्मानपत्र, सन्मानचिन्ह व रोख रक्कम ५ हजार अशा मान्यवर स्वरूपात चिंदरकर यांचा सन्मान करण्यात आला.
वराड गाव तसेच कट्टा पंचक्रोशीत निस्वार्थी, समर्पित समाजसेवी व्यक्ती म्हणून ओळख असलेल्या विद्याधर चिंदरकर यांच्या कार्याचा गौरव म्हणून यंदाचा मधु वालावलकर पुरस्कार जाहीर करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला विकास म्हाडगुत यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले, तर दीपक भोगटे यांनी प्रास्ताविक केले. किशोर शिरोडकर यांनी सन्मानपत्र वाचन केले.
कार्यक्रमातील प्रमुख पाहुण्या सरपंच शलाका रावले म्हणाल्या, “चिंदरकर यांची समाजासाठीची निस्वार्थी भावना हे आमच्या गावाचे अभिमानस्थान आहे. त्यांचा सन्मान म्हणजे संपूर्ण गावाचा गौरव आहे.”
इतिहास संशोधक डॉ. ज्योती तोरसकर म्हणाल्या, “माणसाच्या रूपात मदतीला धावून जाणारा देव म्हणजे चिंदरकर. त्यांच्या मदतीने अनेकांचे प्रश्न सुटतात.”
प्रा. डॉ. सुमेधा नाईक म्हणाल्या, “प्रत्येक गावात एक ‘विद्या दादा’ तयार झाला तर समाज बदलायला वेळ लागणार नाही.”
कार्यक्रमात मधू सावंत, बाळू वराडकर, दत्तात्रय टेमकर, बबन पांचाळ, सुनील नाईक, श्वेता तेंडुलकर, वराड शाळेच्या मुख्याध्यापिका मयेकर, आनंद धुत्रे यांसह मान्यवरांनी मनोगते व्यक्त केली.
यावेळी वराड गावातील वयोवृद्ध नागरिकांचा सेवांगणतर्फे शाल व श्रीफळ देऊन विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ॲड. प्रदीप मिठबावकर यांनी केले.
कार्यक्रमास लक्ष्मीकांत खोबरेकर, राजा खांडाळेकर, अर्चना धुत्रे, पत्रकार विशाल वाईरकर, अण्णा मोरजकर, रामचंद्र आंबेरकर, शरद मोरजकर, रवी परब, सिताराम मिठबांवकर, प्रवीण मिठबावकर, वैजयंती वराडकर, हरी परब, टिकम मॅडम, गौरांगी वराडकर, प्रमोद सारंग, गजा परब, अशोक पराडकर, बाळा वराडकर, विनोद आळवे, सुभाष मांजरेकर, सुरेश कांबळी, राजन माणगावकर, शोभा म्हाडगुत, दादा चिंदरकर, राजीव म्हाडगुत, निलेश हडकर, गिरीश आळवे तसेच वराड व परिसरातील मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
समाजसेवेतील सातत्य, नम्रता आणि लोकहिताची तळमळ यासाठी विद्याधर चिंदरकर यांना मिळालेला हा सन्मान योग्य ठरल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.







