तडजोडीस पात्र प्रकरणे सामोपचाराने निकाली काढण्याची संधी; नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन
सिंधुदुर्ग, दि. ८ : प्रतिनिधी
न्यायप्रक्रियेला गती देऊन सर्वसामान्य नागरिकांना जलद, सुलभ आणि कमी खर्चात न्याय मिळवून देण्याच्या उद्देशाने शनिवार, १२ सप्टेंबर २०२६ रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली आणि विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार ही लोकअदालत आयोजित करण्यात येत असून, यावर्षीची ही तिसरी राष्ट्रीय लोकअदालत आहे.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुधीर देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली लोकअदालतीचे आयोजन करण्यात येणार आहे.
या लोकअदालतीमध्ये न्यायालयात प्रलंबित असलेली दिवाणी व तडजोडपात्र फौजदारी प्रकरणे, कौटुंबिक व वैवाहिक वाद, मोटार अपघात दावा प्रकरणे, भूसंपादन व महसुली प्रकरणे, धनादेश अनादर (चेक बाऊन्स) प्रकरणे तसेच वीज बिल, पाणीपट्टी आदी तडजोडीस पात्र प्रकरणे निकाली काढण्यात येणार आहेत.
तसेच बँका, वित्तीय संस्था आणि विमा कंपन्यांशी संबंधित तडजोडीस पात्र प्रकरणे, तसेच न्यायालयात दाखल होण्यापूर्वीचे वादही लोकअदालतीमध्ये सामोपचाराने सोडविण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
वेळ, पैसा आणि मानसिक त्रासाची बचत
लोकअदालतीमध्ये वाद परस्पर संमतीने आणि सामोपचाराने सोडविले जात असल्याने पक्षकारांचा वेळ, पैसा आणि मानसिक त्रास वाचण्यास मदत होते. लोकअदालतीमध्ये झालेला निवाडा अंतिम असून तो दोन्ही पक्षकारांवर बंधनकारक असतो. तसेच प्रकरण लोकअदालतीत निकाली निघाल्यास नियमानुसार भरलेले न्यायालयीन शुल्क परत मिळण्याची तरतूद आहे.
प्रलंबित आणि दाखलपूर्व प्रकरणांसाठी संधी
तडजोडीस पात्र प्रलंबित प्रकरणांसाठी संबंधित न्यायालयात अर्ज सादर करता येणार आहे. तर न्यायालयात दाखल होण्यापूर्वीच्या वादांसाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण किंवा संबंधित तालुका विधी सेवा समितीशी संपर्क साधता येईल.
नागरिक, शासकीय विभाग, बँका, वित्तीय संस्था, विमा कंपन्या तसेच संबंधित पक्षकारांनी आपल्या तडजोडीस पात्र प्रकरणांचा आढावा घेऊन राष्ट्रीय लोकअदालतीचा लाभ घ्यावा आणि मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव आर. व्ही. नडगदळ्ळी यांनी केले आहे.






