मालवण, दि. ८ : प्रतिनिधी
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवण शहर व तालुक्यातील वाहतूक व्यवस्था, सुरक्षितता आणि गणेशमूर्ती विसर्जन व्यवस्थेचा प्रशासनाने आढावा घेतला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक पंडित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या आढावा बैठकीत विविध विभागांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या. गणेशोत्सव काळात वाहतूक कोंडी होऊ नये, कायदा-सुव्यवस्था अबाधित राहावी आणि विसर्जन प्रक्रिया सुरक्षितपणे पार पडावी, यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे.
बैठकीस निवासी नायब तहसीलदार विनायक जांभेकर यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभाग, तालुका आरोग्य अधिकारी, पंचायत समिती, नगरपरिषद, महावितरण, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे, रिक्षा संघटना तसेच खासगी ट्रॅव्हल्सच्या प्रतिनिधींची उपस्थिती होती.
शहरातील वाहतुकीवर निर्बंध
गणेशोत्सव काळात शहरातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी विविध मार्गांवर वाहतूक निर्बंध लागू करण्यात येणार आहेत. नाट्यगृह आवार, बांगीवाडा येथे सहा सीटर वाहनांसाठी व्यवस्था करण्यात येणार आहे. सारस्वत बँक परिसरात मोटारसायकली एका बाजूने पार्क करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
बाजारपेठेतील राणे मेडिकल येथून सर्व वाहनांच्या वाहतुकीवर बंदी राहणार आहे. बॉम्बे टेक्स्टाईल येथे सायकलींसाठी प्रवेश ठेवण्यात येणार असून नेरुरकर गल्ली सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद राहणार आहे. बाजारपेठ रस्त्यावर वाहन पार्किंगलाही बंदी करण्यात आली आहे.
नो-पार्किंग क्षेत्रात वाहने उभी केल्यास संबंधित वाहनधारकांवर पोलिसांकडून दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. तसेच देऊळवाडा नाका येथून अवजड वाहनांना प्रवेशबंदी राहणार असून शहरातील प्रमुख नाक्यांवर पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.
फळ विक्रेत्यांसाठीही नियोजन
भंडारी हायस्कूल ते भाजी मार्केट या मार्गावर बाजारपेठेतील सर्व फळ विक्रेत्यांनी नगरपरिषदेने निश्चित केलेल्या जागेत एका रांगेत व्यवसाय करावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे गणेशोत्सव काळात बाजारपेठेत होणारी वाहतूक कोंडी कमी करण्यास मदत होणार आहे.
ध्वनिक्षेपकांसाठी ऑनलाइन परवाना बंधनकारक
गणेशोत्सव मंडळांकडून ध्वनिक्षेपकांचा वापर करताना नियमांचे काटेकोर पालन करण्यावर बैठकीत भर देण्यात आला. बॅन्जो, स्पीकर तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून वापरण्यात येणाऱ्या ध्वनिक्षेपकांसाठी ऑनलाइन परवाना घेणे अनिवार्य करण्यात आले आहे. परवानगीशिवाय ध्वनिक्षेपकांचा वापर करणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करण्यात येणार आहे.
विसर्जनस्थळी जीवरक्षकांची नियुक्ती
गणेशमूर्ती विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर शहरासह ग्रामपंचायत हद्दीतील विसर्जनस्थळी जीवरक्षक नियुक्त करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. विसर्जनाच्या वेळी संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी आवश्यक ती सुरक्षा व्यवस्था ठेवण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांना देण्यात आले.
गणेशोत्सव शांततेत, सुरक्षित वातावरणात आणि वाहतुकीला अडथळा न आणता पार पडावा, यासाठी सर्व संबंधित विभागांनी परस्पर समन्वयाने काम करण्याचे निर्देश बैठकीत देण्यात आले. त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवात वाहतूक, कायदा-सुव्यवस्था आणि विसर्जन व्यवस्थेवर प्रशासनाचा विशेष भर राहणार आहे.






