कोकणच्या पारंपरिक लोककलेला गणेशमूर्तीच्या माध्यमातून अनोखा साज; परेलच्या तकदीर टेरेस मित्रमंडळासाठी साकारली साडेसहा फुटांची मूर्ती
मालवण, दि. ८ : प्रतिनिधी
कोकणच्या मातीत रुजलेली पारंपरिक लोककला, श्रद्धा आणि गणेशभक्ती यांचा अनोखा संगम यंदाच्या गणेशोत्सवात पाहायला मिळणार आहे. मालवणच्या गणेश चित्रशाळेत कोकणातील पारंपरिक दशावतार लोककलेची संकल्पना साकारत गणरायाची सुबक आणि देखणी मूर्ती घडविण्यात आली आहे. मूर्तिकार हेमंत रामाडे यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने साकारलेली ही साडेसहा फूट उंचीची आकर्षक मूर्ती मुंबईतील परेल येथील तकदीर टेरेस मित्रमंडळासाठी रवाना झाली आहे.
गणेशोत्सवासाठी दरवर्षी आपल्या कल्पकतेतून तसेच गणेशभक्तांच्या मागणीनुसार विविध संकल्पनांवर आधारित मूर्ती साकारणारे हेमंत रामाडे यांच्यासाठी यंदाची ही ऑर्डर विशेष आव्हानात्मक होती. तकदीर टेरेस मित्रमंडळाने कोकणातील दशावतार या पारंपरिक लोककलेवर आधारित गणेशमूर्ती साकारण्याची संकल्पना त्यांच्यासमोर ठेवली. ही संकल्पना स्वीकारत रामाडे यांनी मूर्तीनिर्मितीला सुरुवात केली आणि अथक मेहनतीतून दशावताराचा कलात्मक आविष्कार असलेला गणराय साकारला.
या मूर्तीची संकल्पना किशोर कांदळगावकर यांची असून, कोकणच्या लोककलेचे वैशिष्ट्य आणि गणेशभक्ती यांचा सुरेख मेळ साधण्याचा प्रयत्न या मूर्तीमधून करण्यात आला आहे. त्यामुळे पारंपरिक दशावतार कलेला आधुनिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून नव्या पिढीसमोर आणण्याचे कामही या मूर्तीच्या माध्यमातून होत आहे.
मुंबईला रवाना होणारी यंदाची पहिली मूर्ती
यंदाच्या गणेशोत्सवासाठी मालवणच्या श्री गणेश चित्रशाळेतून मुंबईला रवाना होणारी ही पहिली गणेशमूर्ती ठरली आहे. विशेष म्हणजे तकदीर टेरेस मित्रमंडळ आणि रामाडे यांच्या गणेशमूर्ती निर्मितीचा हा जुना संबंध आहे.
या मंडळासाठी यापूर्वी २०१० मध्ये २,१२१ मोदकांची संकल्पना असलेली गणेशमूर्ती साकारण्यात आली होती. त्यानंतर आयर्लंडमधील एका गार्डनसाठी तबला वाद्य वाजविताना दिसणाऱ्या स्वरूपातील गणेशमूर्तीची ऑर्डरही मंडळाच्या माध्यमातून देण्यात आली होती. तसेच कापसाच्या मोदकांची संकल्पना असलेली गणेशमूर्तीही याच श्री गणेश चित्रशाळेत साकारण्यात आली आहे.
कलाकारांच्या मेहनतीला मिळाली दाद
दशावतार संकल्पनेतील ही भव्य मूर्ती साकारताना हेमंत रामाडे यांना हर्षद तळवडेकर, राकेश वेंगुर्लेकर, योगेश परब, सिद्धार्थ परब, निनाद आडकर, दीप मुंबरकर, वैभव पुरंदरे, साई दांडकर यांच्यासह अन्य सहकाऱ्यांचे महत्त्वपूर्ण सहकार्य लाभले.
“दशावतारासारख्या कोकणातील पारंपरिक लोककलेला गणेशमूर्तीच्या माध्यमातून साकारण्याची संधी मिळणे ही आमच्यासाठी आनंदाची बाब आहे. मंडळाने दिलेली संकल्पना आव्हानात्मक होती; मात्र सहकाऱ्यांच्या मेहनतीमुळे ती प्रत्यक्षात आणता आली,” असे मूर्तिकार हेमंत रामाडे यांनी सांगितले.
कोकणच्या मातीत जन्मलेल्या दशावतार या लोककलेचा वारसा गणरायाच्या रूपातून मुंबईत पोहोचणार असल्याने या मूर्तीबाबत मालवणमध्येही उत्सुकता निर्माण झाली आहे. श्रद्धा, कलात्मकता आणि कोकणच्या सांस्कृतिक परंपरेचा सुंदर मिलाफ असलेली ही गणेशमूर्ती यंदाच्या गणेशोत्सवात निश्चितच आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे.






