देवदत्त परुळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली दोन दिवस ज्ञानेश्वरीचा सखोल अभ्यास; कीर्तन, भजन आणि संवादातून संतविचारांचे सेलिब्रेशन
मालवण, : ज्ञानेश्वर माऊलींच्या जयंतीचा भाव मनात ठेवत मालवणातील बॅ. नाथ पै सेवांगण येथे २९ व ३० ऑगस्ट रोजी ‘रिंगण वारकरी वीकेण्ड २०२६’ उत्साहपूर्ण आणि वैचारिक वातावरणात पार पडला. वारकरी परंपरेतील संतविचार, ज्ञानेश्वरीचे तत्त्वज्ञान आणि सामाजिक परिवर्तनाचा विचार यांचा अनोखा संगम या दोन दिवसीय उपक्रमातून साधण्यात आला.
‘वारकरी’ आणि ‘वीकेण्ड’ हे दोन शब्द एकत्र येणे काहींना वेगळे वाटू शकते. मात्र, ‘रिंगण’च्या संकल्पनेत आनंद, खेळ, संवाद आणि विचारांचे सेलिब्रेशन अभिप्रेत आहे. वारीतील रिंगण हे केवळ धार्मिक विधी नसून आनंदोत्सवाचे प्रतीक आहे. संत ज्ञानेश्वर, संत नामदेव आणि संत तुकाराम यांच्या विचारांमधूनही जीवनाकडे आनंदाने पाहण्याची हीच दृष्टी दिसून येते. औपचारिक भाषणांपेक्षा अनौपचारिक संवादातून विचारांसोबत मनाचीही तार छेडली जाते, या भूमिकेतून ‘रिंगण वारकरी वीकेण्ड’ची संकल्पना पुढे आली आहे.
या उपक्रमाची सुरुवात २०२० मध्ये प्रजासत्ताक दिनी पंढरपूरजवळील चिंचणी येथे झाली होती. एक शनिवार-रविवार, एक वक्ता, एक विषय आणि गप्पांमधून विचारांचे सेलिब्रेशन, अशी या उपक्रमाची संकल्पना आहे. पहिल्या वीकेण्डमध्ये ज्येष्ठ विचारवंत डॉ. सदानंद मोरे यांनी ‘वारकरी संप्रदायाचा इतिहास’ या विषयावर मार्गदर्शन केले होते.
यंदाचा वीकेण्ड मालवणात घेण्यामागे ज्ञानेश्वरीचा सखोल अभ्यास हा केंद्रस्थानी होता. सेवांगण येथे झालेल्या रिंगणच्या कीर्तन प्रशिक्षण शिबिरात देवदत्त परुळेकर यांचे ज्ञानेश्वर माऊलींवरील कीर्तन ऐकल्यानंतर त्यांच्यासोबत दोन दिवस बसून ज्ञानेश्वरी समजून घेण्याची कल्पना पुढे आली. त्यातून यंदाच्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
शनिवारी सकाळी हभप दत्ता महाराज दोन्हे यांच्या पंचपदी भजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. अभिजित सोनावणे यांनी आपल्या शैलीत देवदत्त परुळेकर यांची ओळख करून दिल्यानंतर परुळेकर यांनी ‘ज्ञानेश्वरी एक धर्मग्रंथ’ या विषयावर पहिली मांडणी केली. ज्ञानेश्वरीने वारकरी अथवा भागवत धर्माचा पाया कसा रचला, याचा त्यांनी सुसंगत ऊहापोह केला.
परुळेकर यांच्या संवादात्मक शैलीने उपस्थितांना विशेष भावले. विद्वत्तेचा बडेजाव नाही, अमोघ वक्तृत्वाचा अनाठायी आव नाही आणि विषयाचे उगाचच सुलभीकरणही नाही, अशी त्यांची मांडणी होती. आयुष्यभराच्या व्यासंगातून आलेली ही शैली आणि संतविचारांचा गाभा यामुळे दोन दिवसांचे चिंतन श्रोत्यांसाठी समृद्ध करणारे ठरले.
या दोन दिवसांत ‘ज्ञानेश्वरी एक धर्मग्रंथ’, ‘चिद्विलासाचं क्रांतिकारक तत्त्वज्ञान’, ‘भक्तीतून मूल्य परिवर्तन’ आणि ‘सद्गुण संवर्धनाचं अध्यात्म अर्थात सॉफ्ट स्किल्स डेव्हलपमेंट’ या चार विषयांवर परुळेकर यांनी मार्गदर्शन केले. व्याख्यानांइतकाच प्रश्नोत्तरांच्या सत्रावरही भर देण्यात आला. त्यामुळे मांडलेले विचार सहभागींच्या मनात पुढेही घोळत राहिले.
अमृता मोरे यांनी संतांच्या अभंगांमधून व्यक्त झालेली ज्ञानेश्वर माऊलींची थोरवी मांडली. हभप वैभव महाराज गमे यांनी ‘पसायदान’च्या तत्त्वज्ञानाचा उलगडा केला. शनिवारी सायंकाळी स्वामीराज महाराज भिसे यांनी संत जनाबाईंच्या ‘वाचावी ज्ञानेश्वरी’ या अभंगाच्या आशयाला केंद्रस्थानी ठेवत कीर्तन सादर केले. विचारप्रवर्तकता आणि रसाळपणा यांचा सुरेख मेळ या कीर्तनातून साधला गेला. हभप दत्ता महाराज दोन्हे यांच्यासह हभप सोपान कांगुणे यांच्या गोड गायनाने कार्यक्रमाला रंगत आणली. अश्विनी टाव्हरे यांनी वीणेची, तर ओंकार जमदाडे यांनी पखवाजाची साथ दिली.
दोन दिवसांत संपूर्ण ज्ञानेश्वरी समजून घेणे शक्य नसले तरी तिच्या अभ्यासाची दिशा आणि सार समजून घेण्याची संधी या उपक्रमातून मिळाली. ‘रिंगण’ हा संतपरंपरेचा सामाजिक आणि सांस्कृतिक मागोवा घेण्याचा प्रयत्न असून, त्यातील ज्ञानेश्वरीचा हा अभ्यास महत्त्वाचे पाऊल ठरल्याची भावना सहभागींच्या मनात होती. अध्यात्म आणि धर्माच्या पारंपरिक चौकटीपलीकडे जाऊन ज्ञानेश्वरीतील सामाजिक परिवर्तनाचे विचार जाणून घेता आले, हे या उपक्रमाचे विशेष वैशिष्ट्य ठरले.
या वीकेण्डसाठी सिंधुदुर्गासह कोल्हापूर, सातारा, गोवा, सोलापूर, परभणी आणि पुणे-मुंबई येथून निवडक सहभागी मालवणात दाखल झाले होते. सिंधुदुर्गातून मंगलताई परुळेकर, अजय कांडर, प्रवीण दशरथ बांदेकर, मधुकर मातोंडकर, हरिहर वाटवे, योगेश सकपाळ, गोरक्ष परब, मयुरी गावडे, संदीप निंबाळकर, लक्ष्मीकांत खोबरेकर आदी सहभागी झाले. गाथा परिवाराचे उल्हास पाटील व प्राचार्य दीनानाथ पाटील, कोल्हापूरचे राजेंद्र मांडवकर व जयसिंग पाटील, साताऱ्याचे मुकुंद व अस्मिता बहाळकर, गोव्याचे क्रांतिराज सम्राट सहकुटुंब, तसेच सोलापूर व परभणी येथील सहभागी उपस्थित होते.
पुण्याहून दत्ता दोन्हे, अमृता मोरे, अश्विनी टाव्हरे, वैभव गमे, स्वामीराज भिसे, सोपान कांगुणे, अमृता देसर्डा, अभिजित सोनावणे आदी सहभागी झाले. मुंबईहून नीलेश बने, हर्षदा परब, सिद्धेश सावंत, सागर मोहन, अन्वय जावळकर, विकास चव्हाण, सागर शितोळे आदी उपस्थित होते






