कर्ली-तारकर्लीसह पाच जलमार्गांवर आधुनिक फेरीबोट सेवा प्रस्तावित; पर्यटन, स्थानिक व्यवसाय आणि रोजगारनिर्मितीला मिळणार नवी दिशा
मालवण, दि. ८ : प्रतिनिधी
मुंबई-पुण्यासारख्या मोठ्या शहरांकडे रोजगाराच्या शोधात होणारे कोकणातील तरुणांचे स्थलांतर थांबवून मूळ गावातच रोजगार आणि व्यवसायाच्या संधी निर्माण करण्याच्या ‘रिव्हर्स मायग्रेशन’च्या संकल्पनेला सिंधुदुर्गात जलवाहतुकीच्या माध्यमातून नवी दिशा मिळण्याची शक्यता आहे. मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत जिल्ह्यातील अंतर्देशीय जलवाहतूक अधिक वेगवान, सुरक्षित, आधुनिक आणि पर्यटनपूरक करण्याबाबत महत्त्वपूर्ण चर्चा झाली.
या बैठकीमुळे पर्यटन व्यावसायिक महासंघाच्या गेल्या अनेक वर्षांच्या मागणीला आता मूर्त स्वरूप मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. महासंघाचे अध्यक्ष विष्णू मोंडकर यांनी या मागणीचा सातत्याने पाठपुरावा केल्याचे सांगत जलवाहतुकीच्या प्रस्तावाबाबत पालकमंत्री नितेश राणे यांचे विशेष आभार मानले आहेत.
कर्ली-तारकर्लीचा प्रवास अवघ्या १० ते १५ मिनिटांत
या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांतर्गत कर्ली ते तारकर्ली या जलमार्गावर प्रायोगिक तत्त्वावर अत्याधुनिक फेरीबोट सेवा सुरू करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. सध्या रस्तेमार्गाने जादा वळणांमुळे या प्रवासासाठी सुमारे २५ ते ३० किलोमीटरचे अंतर आणि एक ते दोन तासांचा कालावधी लागतो. जलवाहतूक सुरू झाल्यानंतर हाच प्रवास अवघ्या १० ते १५ मिनिटांत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.
यामुळे पर्यटक आणि स्थानिकांचा प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात वाचण्याबरोबरच इंधनाची बचत, रस्त्यांवरील वाहतुकीचा ताण आणि अपघातांचा धोका कमी होण्यास मदत होणार आहे. पर्यटनाच्या दृष्टीनेही विविध किनारी भाग एकमेकांशी अधिक वेगाने जोडले जाणार आहेत.
पाच जलमार्गांवर कनेक्टिव्हिटी वाढविण्याचा विचार
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अंतर्गत कनेक्टिव्हिटी मजबूत करण्यासाठी प्राथमिक स्तरावर कर्ली-तारकर्ली, कर्ली-देवबाग, देवबाग-निवती, विजयदुर्ग-अनसुरे दांडे आणि आरोंदा-किरणपाणी या पाच मार्गांवर जलवाहतूक सेवा सुरू करण्याचा विचार आहे.
ही सेवा प्रत्यक्षात आल्यास समुद्र, खाडी आणि नदीमार्गाशी जोडलेल्या अनेक गावांना नव्या वाहतूक व्यवस्थेचा लाभ मिळू शकतो. पर्यटनस्थळांदरम्यानचा प्रवास सुलभ झाल्याने पर्यटकांना एकाच वेळी अनेक पर्यटनस्थळांना भेट देणे शक्य होणार आहे.
पर्यटनासोबत स्थानिक अर्थव्यवस्थेलाही चालना
जलवाहतूक केवळ प्रवासाचे अंतर कमी करणारी व्यवस्था न राहता स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देणारे माध्यम ठरू शकते. कर्ली, अनसुरे, आरोंदा यांसारख्या भागांच्या पर्यटन विकासाला यामुळे वेग मिळण्याची शक्यता आहे.
चिपी विमानतळ, वेंगुर्ला परिसर तसेच गोव्यातून सिंधुदुर्गात येणाऱ्या पर्यटकांसाठी मालवण, वायरी, तारकर्ली आणि देवबाग या पर्यटनस्थळांपर्यंत पोहोचणे अधिक सुलभ होईल. प्रवासातील वेळ कमी झाल्याने पर्यटकांचा मुक्काम वाढण्यासह स्थानिक पर्यटन व्यवसायाची उलाढाल वाढण्याची शक्यता आहे.
हॉटेल, होमस्टे, वॉटर स्पोर्ट्स, स्थानिक वाहतूक, पर्यटक मार्गदर्शक, खाद्य व्यवसाय तसेच विविध पर्यटनपूरक सेवांमध्ये रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होऊ शकतात.
‘रिव्हर्स मायग्रेशन’ला प्रत्यक्ष आधार
सिंधुदुर्गातील अनेक तरुण रोजगारासाठी मुंबई, पुणे आणि अन्य मोठ्या शहरांकडे स्थलांतरित झाले आहेत. मात्र स्थानिक पातळीवर पर्यटन, जलवाहतूक आणि सागरी अर्थव्यवस्थेशी संबंधित व्यवसायाच्या संधी उपलब्ध झाल्यास हेच तरुण मूळ गावी परतून स्वतःचा व्यवसाय उभारू शकतात, अशी अपेक्षा आहे.
पालकमंत्री नितेश राणे यांनी मांडलेल्या ‘रिव्हर्स मायग्रेशन’च्या संकल्पनेला जलवाहतूक प्रकल्पामुळे प्रत्यक्ष आर्थिक आधार मिळू शकतो. गावाकडील पर्यटनस्थळे वाहतुकीने जोडली गेली, तर पर्यटक वाढतील; पर्यटक वाढले की स्थानिक व्यवसाय वाढतील आणि त्यातून रोजगारनिर्मिती होईल, असे या संकल्पनेचे आर्थिक गणित आहे.
स्थानिक जहाजबांधणीला मिळणार नवे क्षेत्र
जलवाहतूक वाढल्यास केवळ फेरीबोट चालविण्यापुरत्याच संधी मर्यादित राहणार नाहीत. स्थानिक पातळीवरील आधुनिक जहाजबांधणी, सागरी अभियांत्रिकी, बोट दुरुस्ती आणि देखभाल या क्षेत्रांनाही मोठा वाव मिळू शकतो.
त्यामुळे सिंधुदुर्गाच्या सागरी अर्थव्यवस्थेला पर्यटनाची जोड मिळून स्थानिक युवकांसाठी कौशल्याधारित रोजगाराचे नवे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे.
‘सुवर्णपान’ ठरण्याचा विश्वास
“सिंधुदुर्गातील अंतर्देशीय जलवाहतुकीची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने करण्यात येत होती. आता या मागणीच्या दृष्टीने मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक होऊन प्रत्यक्ष कार्यवाहीला दिशा मिळत आहे. जलवाहतूक सुरू झाल्यास पर्यटनासोबत स्थानिक रोजगार आणि व्यवसायाच्या संधी वाढतील. सिंधुदुर्गाच्या शाश्वत विकासात आणि ‘रिव्हर्स मायग्रेशन’च्या प्रवासात हा प्रकल्प एक महत्त्वाचा टप्पा, किंबहुना सुवर्णपान ठरेल,” असा विश्वास पर्यटन व्यावसायिक महासंघाचे अध्यक्ष विष्णू मोंडकर यांनी व्यक्त केला.
सिंधुदुर्गच्या समुद्रकिनाऱ्यांना आणि खाड्यांना जोडणारी ही जलवाहतूक प्रत्यक्षात आली, तर ‘पर्यटकांना गावाकडे आणणे’ आणि ‘तरुणांना गावाकडे परत आणणे’ या दोन्ही उद्दिष्टांना एकाच वेळी बळ मिळू शकते. त्यामुळे आगामी काळात सिंधुदुर्गातील पर्यटन विकासाची दिशा केवळ समुद्रकिनाऱ्यांपुरती मर्यादित न राहता जलमार्गांभोवती आकार घेण्याची शक्यता आहे.






