जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांचे मालवण नगरपरिषद प्रशासनाला कडक निर्देश
मालवण, दि. ७ (प्रतिनिधी) : विकासकामांमध्ये दिरंगाई करणाऱ्या अथवा संथ गतीने काम करणाऱ्या ठेकेदारांची कोणतीही गय केली जाणार नाही. कामात निष्काळजीपणा आढळल्यास संबंधित ठेकेदारांवर तात्काळ दंडात्मक कारवाई करावी. तसेच कामाच्या गुणवत्तेत किंवा वेळेत सातत्याने कसूर करणाऱ्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याची प्रक्रिया प्रस्तावित करावी, असे कडक निर्देश जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी मालवण नगरपरिषदेच्या अभियंत्यांना दिले.
मालवण नगरपरिषद सभागृहात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या प्रमुख उपस्थितीत नगरपरिषदेच्या विविध विकासकामांचा आढावा घेण्यासाठी महत्त्वपूर्ण बैठक झाली. यावेळी शहरातील प्रलंबित तसेच सुरू असलेल्या विविध विकासकामांची सविस्तर माहिती घेण्यात आली. प्रत्येक प्रकल्पाला गती देतानाच कामाचा दर्जा आणि गुणवत्ता कायम राखण्याच्या स्पष्ट सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
या बैठकीस नगराध्यक्षा ममता वराडकर, मुख्याधिकारी प्रतीक थोरात यांच्यासह नगरपरिषदेचे प्रमुख अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
विविध महत्त्वाच्या प्रकल्पांचा आढावा
बैठकीत भाजी मार्केट नूतनीकरण, मामा वरेरकर नाट्यगृह वाणिज्य संकुल व नाट्यगृह नूतनीकरण, रॉक गार्डन सुशोभीकरण, नमो उद्यान विकास, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स निर्मिती, नगरोत्थान योजना, पाणीपुरवठा योजना तसेच भुयारी गटार योजना आदी महत्त्वाच्या प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला.
प्रत्येक प्रकल्पाची सद्यस्थिती, कामाची प्रगती, नियोजन आणि अपेक्षित पूर्णत्वाचा कालावधी याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी माहिती घेतली. विकासकामे रखडण्यास अथवा अनावश्यक विलंब होण्यास कारणीभूत ठरणाऱ्या ठेकेदारांवर नियमानुसार कठोर कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
मालवण शहराचा पर्यटनपूरक विकास, पायाभूत सुविधांचे सक्षमीकरण आणि नागरिकांना दर्जेदार नागरी सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने सुरू असलेल्या प्रकल्पांना आता अधिक गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. प्रशासनाच्या निर्देशांमुळे रखडलेल्या विकासकामांना चालना मिळून त्यांचा लाभ नागरिकांना वेळेत मिळेल, अशी अपेक्षा आहे.






