कट्टा येथे तालुकास्तरीय शासकीय क्रीडा स्पर्धांना उत्साहात प्रारंभ

मालवण, दि. ७ (प्रतिनिधी) : तालुका क्रीडा स्पर्धा म्हणजे केवळ विविध खेळांच्या स्पर्धा नव्हेत, तर विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या कौशल्याला, जिद्दीला, आत्मविश्वासाला आणि खिलाडूवृत्तीला व्यासपीठ मिळवून देणारा उत्सव आहे. या उत्सवात सहभागी होणाऱ्या प्रत्येक खेळाडूचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. खेळाडूंनी नियमांचे पालन करताना खिलाडूवृत्ती जोपासावी आणि यश संपादन करताना आपल्या शाळेसह गावाचेही नाव उज्ज्वल करावे, असे प्रतिपादन पंचायत समिती सभापती प्रज्ञा चव्हाण यांनी केले.
क्रीडा व युवक संचलनालय, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद, सिंधुदुर्ग आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने कट्टा येथील वराडकर हायस्कूलच्या मैदानावर तालुकास्तरीय शासकीय क्रीडा स्पर्धांना प्रारंभ झाला. या स्पर्धांचे उद्घाटन पंचायत समिती सभापती प्रज्ञा चव्हाण यांच्या हस्ते झाले.
यावेळी व्यासपीठावर पंचायत समिती सदस्य दीपक चव्हाण, कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव सुनील नाईक, शालेय समितीचे अध्यक्ष सुधीर वराडकर, तालुका क्रीडा अधिकारी बाजीराव देसाई, मुख्याध्यापिका देवयानी गावडे, मालवण तालुका क्रीडा समन्वयक संजय पेंडूरकर, क्रीडा शिक्षक किसन हडलगेकर, महेंद्र वारंग, शैलेश मुळीक, नितीन हडकर, श्री. कुडव, रेनोल्ड बुतेलो, पंकज राणे, श्रीनाथ फणसेकर, आर. बी. देसाई आदी उपस्थित होते.
तालुका क्रीडा समन्वयक संजय पेंडूरकर यांनी प्रास्ताविक केले. मुख्याध्यापिका देवयानी गावडे यांनी स्वागत केले. यावेळी पंचायत समिती सदस्य दीपक चव्हाण यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अभ्यासाबरोबरच क्रीडेलाही तितकेच महत्त्व असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबतच क्रीडा क्षेत्रातही चमकदार कामगिरी करावी, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी सभापती प्रज्ञा चव्हाण, पंचायत समिती सदस्य दीपक चव्हाण तसेच रेकोबा हायस्कूलचे क्रीडा शिक्षक श्रीनाथ फणसेकर आणि भंडारी हायस्कूलचे क्रीडा शिक्षक आर. बी. देसाई यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी शालेय स्तरावरील कबड्डीचे सामने उत्साहात पार पडले. स्पर्धांमध्ये विविध शाळांमधील विद्यार्थी सहभागी झाले असून, पुढील सामन्यांसाठी खेळाडूंमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
कार्यक्रमाचे आभार किसन हडलगेकर यांनी मानले.







