दुरुस्ती व स्वच्छतेबाबत तातडीने कार्यवाहीची मागणी; अन्यथा नगरपालिकेवर मोर्चाचा इशारा
मालवण (प्रतिनिधी) : मालवण शहरातील मच्छी मार्केटच्या दुरवस्थेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. ठाकरे शिवसेनेचे नगरसेवक मंदार ओरसकर आणि तपस्वी मयेकर यांनी मच्छी मार्केटची पाहणी करून स्पॉट पंचनामा केला. यावेळी मार्केटमधील अस्वच्छता, नादुरुस्त स्वच्छतागृहे, सांडपाण्याची समस्या तसेच इतर गैरसोयी निदर्शनास आल्याचा दावा त्यांनी केला.
मच्छी मार्केटची दुरवस्था दूर करण्याबाबत जानेवारीमध्ये नगरपालिकेच्या सत्ताधाऱ्यांकडून पाहणी करून दुरुस्तीचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, आठ महिने उलटूनही परिस्थितीत सुधारणा झालेली नाही, असा आरोप नगरसेवक मंदार ओरसकर आणि तपस्वी मयेकर यांनी केला. स्वच्छतेची जबाबदारी असलेल्या ठेकेदाराच्या कामाबाबतही त्यांनी नाराजी व्यक्त केली.
पाहणीदरम्यान महिला व पुरुष स्वच्छतागृहांची अत्यंत खराब अवस्था असल्याचे, शौचालयाची भांडी फुटलेली असल्याचे आणि टाक्यांमधील सांडपाणी उघड्यावर वाहत असल्याचे निदर्शनास आल्याचे नगरसेवकांनी सांगितले. त्याचबरोबर मार्केटमधील वीज व्यवस्था नादुरुस्त असून, मागील बाजूचे शटर तुटलेले आहे. मार्केट परिसरात कुत्र्यांचा वावरही मोठ्या प्रमाणात असल्याचा दावा त्यांनी केला.
नगरसेवक मंदार ओरसकर म्हणाले की, मच्छी मार्केटची अवस्था दयनीय असताना सत्ताधारी नेमकी कोणती विकासकामे करत आहेत, असा प्रश्न उपस्थित होतो. आरोग्य आणि स्वच्छतेसाठी ठेकेदार नेमलेला असतानाही मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात अस्वच्छता आढळत असल्याचे त्यांनी सांगितले.
मच्छी मार्केटमध्ये स्थानिक ग्राहकांसोबतच पर्यटकांचीही मोठी वर्दळ असते. त्यामुळे मार्केटच्या दुरवस्थेमुळे मालवण शहराची प्रतिमा खराब होण्याची शक्यता आहे. नगरसेवक म्हणून शहराच्या विकासासाठी वारंवार सूचना करूनही त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ओरसकर यांनी केला. प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांनी ठेकेदाराच्या कामाची पाहणी करून मच्छी मार्केटच्या दुरुस्तीबाबत तातडीने कार्यवाही करावी; अन्यथा नगरपालिकेवर मोर्चा काढू, असा इशाराही त्यांनी दिला.
नगरसेवक तपस्वी मयेकर यांनीही मच्छी मार्केटच्या परिस्थितीवरून सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. शहरातील समस्यांकडे लक्ष वेधल्यावर आपण मालवणची बदनामी करत असल्याचे आरोप केले जातात. मात्र, शहरातील अशा समस्या कायम राहिल्यास बदनामीसाठी विरोधकांना दोष देण्याची गरजच नसते, अशी टीका त्यांनी केली.
मच्छी मार्केटमधील मूलभूत सुविधा, स्वच्छता आणि दुरुस्तीची कामे तातडीने हाती घेऊन नागरिक व पर्यटकांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी यावेळी नगरसेवकांनी केली.






