Student Gaurang Ramchandra Malandkar of Rekoba Vidyalaya, Wairi, Malvan, has been selected for the Maharashtra Under-17 State Tennis Cricket Team. His outstanding performance has earned him a place in the state squad, bringing yet another proud achievement to Rekoba Vidyalaya.
मालवण : प्रतिनिधी
मालवण-वायरी येथील रेकोबा विद्यालयात इयत्ता नववीत शिक्षण घेणाऱ्या गौरांग रामचंद्र मालंडकर याची महाराष्ट्र राज्याच्या १७ वर्षांखालील टेनिस क्रिकेट संघात निवड झाली आहे. उत्तर प्रदेश येथे १ ते ३ ऑक्टोबरदरम्यान होणाऱ्या टेनिस क्रिकेट स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाची निवड चाचणी अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी येथे घेण्यात आली. या निवड चाचणीत राज्यभरातील विविध खेळाडूंनी सहभाग घेतला होता.
निवड चाचणीदरम्यान गौरांगने आपल्या उत्कृष्ट आणि सातत्यपूर्ण खेळाचे प्रदर्शन करत महाराष्ट्राच्या १७ वर्षांखालील संघात स्थान निश्चित केले. गौरांग हा अष्टपैलू खेळाडू असून त्याच्या कामगिरीची दखल घेत त्याची राज्य संघासाठी निवड करण्यात आली.
या यशामागे रेकोबा विद्यालयाचे क्रीडा शिक्षक श्री. फणसेकर यांचे मार्गदर्शन लाभले. शालेय स्तरावर सातत्याने सराव आणि उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गौरांगच्या निवडीमुळे विद्यालयातील क्रीडा क्षेत्राला नवी ऊर्जा मिळाली आहे.
गौरांगच्या या उल्लेखनीय यशाबद्दल रेकोबा विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय खोचरे, शिक्षकवृंद आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी त्याचे अभिनंदन केले असून, आगामी स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. गौरांगच्या राज्य संघातील निवडीमुळे मालवणच्या क्रीडा क्षेत्रातही आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.






