मालवण (प्रतिनिधी) : मालवण धुरीवाडा भागाचे मूळ रहिवासी तथा मुंबई लालबाग येथील रहिवासी भगवान (बाळा) संभाजी कासवकर (वय ७८) यांचे मंगळवारी सकाळी मुंबई येथील रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्या निधनामुळे मालवणसह मुंबईतील नातेवाईक, मित्रपरिवार आणि परिचितांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
भगवान कासवकर यांनी मुंबईतील कांदिवली येथील महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीच्या जीप विभागात सुमारे २५ वर्षे अधिकारी म्हणून सेवा बजावली. कंपनीतील कँटीन विभागाचे युनियन लीडर म्हणूनही त्यांनी काम पाहिले. कामगारांच्या प्रश्नांसाठी सक्रिय भूमिका बजावत त्यांनी सहकाऱ्यांमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातही त्यांचा सहभाग होता. ते उबाठा शिवसेनेचे कार्यकर्ते म्हणून कार्यरत होते.
नोकरीतून स्वेच्छानिवृत्ती घेतल्यानंतर गेल्या काही वर्षांपासून ते मुंबई तसेच मालवण येथे वास्तव्यास होते. मालवणशी असलेली आपली नाळ त्यांनी कायम जपली होती. त्यांच्या पार्थिवावर मालवण धुरीवाडा येथील कासवकर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
त्यांच्या पश्चात दोन मुलगे, एक मुलगी, भाऊ, भावजय, पुतणे असा परिवार आहे. मालवण धुरीवाडा येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते भाई कासवकर तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते अशोक कासवकर यांचे ते बंधू होत. तर मालवणच्या ज्येष्ठ नगरसेविका सौ. दर्शना कासवकर यांचे ते दीर होत.
भगवान (बाळा) कासवकर यांच्या निधनाने कासवकर कुटुंबीयांसह त्यांच्या मित्रपरिवारावर शोककळा पसरली आहे.






