मालवण (प्रतिनिधी) :
सभासद आणि हजारो ग्राहकांच्या विश्वासाच्या बळावर मालवण तालुका सहकारी खरेदी-विक्री संघाने यशस्वी वाटचाल करत ९७ वर्षे पूर्ण केली आहेत. केवळ आर्थिक नफा हा उद्देश न ठेवता ग्राहकांचे समाधान, उत्तम दर्जाचा माल आणि विनम्र सेवा या त्रिसूत्रीवर संस्थेचे कामकाज सुरू आहे. सभासद आणि ग्राहकांनी दाखविलेल्या विश्वासामुळे संस्थेची ही प्रदीर्घ वाटचाल शक्य झाली असून, भविष्यातही त्यांच्या सहकार्याने संघ अधिक सक्षम आणि ग्राहकाभिमुख करण्याचा निर्धार चेअरमन राजन गावकर यांनी व्यक्त केला.
मालवण तालुका सहकारी खरेदी-विक्री संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा चेअरमन राजन गावकर यांच्या अध्यक्षतेखाली कोळंब येथील समर्थ मंगल कार्यालयात झाली. यावेळी व्हा. चेअरमन कृष्णा ढोलम, संचालक महेश मांजरेकर, के. पी. चव्हाण, अशोक तोडणकर, विजय ढोलम, प्रफुल्ल प्रभू, महेश गावकर, अमित गावडे, रमेश हडकर, सुरेश चौकेकर, अभय प्रभुदेसाई, राजेंद्र प्रभुदेसाई, अमृता सावंत, व्यवस्थापक रघुनाथ चव्हाण यांच्यासह मोठ्या संख्येने सभासद उपस्थित होते.
सभेदरम्यान संघाच्या सभासदांच्या गुणवंत पाल्यांचा तसेच वर्षभरात सर्वाधिक साहित्य खरेदी करणाऱ्या दोन सभासदांचा सत्कार करण्यात आला. कृषी विभागाच्या वतीने मोबाईलवरून खत बुकिंग कसे करावे, याबाबत उपस्थित सभासद शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
व्यवसायवृद्धीसाठी विकासकामांचे नियोजन
यावेळी चेअरमन राजन गावकर म्हणाले की, संस्थेच्या व्यवसायवृद्धीसाठी संचालक मंडळाने ग्राहक आणि सभासदांच्या सूचना व गरजा लक्षात घेऊन विविध विकासकामांचे नियोजन केले आहे. त्यामध्ये स्वतंत्र खत गोडाऊन, सिंधुसागर इमारतीचा विकास आणि सिंधुबझारचा विस्तार यांचा समावेश आहे.
संस्थेचे स्वतंत्र खत गोडाऊन असावे, या उद्देशाने कातवड-खैदा येथे स्वतंत्र खत गोडाऊन उभारून ते कार्यान्वित करण्यात आले आहे. मात्र शहरातील ग्राहकांना खत खरेदीसाठी खैदा-कातवड येथे जावे लागत असल्याने मुख्य कार्यालयाजवळच गोडाऊन असावे, अशी मागणी होती. ग्राहकांची ही अडचण लक्षात घेऊन संस्थेने मुख्य कार्यालयाजवळ नवीन खत गोडाऊन बांधून पूर्ण केले असून तेही कार्यान्वित करण्यात आले आहे.
सिंधुसागर इमारतीतून अतिरिक्त उत्पन्न
संस्थेच्या नवीन ‘सिंधुसागर’ इमारतीचे तळमजल्यासह सहा व्यापारी गाळ्यांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. यापैकी दोन गाळ्यांमध्ये संस्थेचा भारतगॅस विभाग सुरू करण्यात आला आहे, तर उर्वरित चार गाळे टीजेएसबी बँकेला भाडेतत्त्वावर देण्यात आले आहेत. या माध्यमातून संस्थेला अतिरिक्त उत्पन्नाचा स्रोत उपलब्ध झाला आहे.
सिंधुबझारचा विस्तार
संस्थेचा सिंधुबझार व्यवसाय दरवर्षी वाढत असून, गर्दीच्या हंगामात ग्राहकांना उपलब्ध जागा अपुरी पडत आहे. वाढता व्यवसाय आणि ग्राहकांची वाढती गरज लक्षात घेऊन सिंधुबझार इमारतीचे विस्तारीकरण करून अधिक प्रशस्त बाजारपेठ उभारण्याचे धोरण आखण्यात आले आहे. या कामाची लवकरच अंमलबजावणी करण्याचा संस्थेचा मानस असल्याचे राजन गावकर यांनी सांगितले.
ग्रामीण भागातही व्यवसाय विस्तार
व्यवसायवृद्धीसाठी ग्रामीण भागावरही लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ग्रामीण भागातील कुटुंबांशी थेट संपर्क साधून त्यांच्या गरजेनुसार आवश्यक साहित्य उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात येत आहे. त्यामुळे संघाच्या व्यवसायाचा विस्तार तालुक्याच्या ग्रामीण भागातही होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
सभेत अशोक सावंत, उपनगराध्यक्ष दीपक पाटकर, नगरसेवक सुदेश आचरेकर, राजन भोजने, आबा ढोलम, मनोज लुडबे, आपा चव्हाण, प्रदीप ढोलम, दाजी हडकर, नंदू देसाई, भगवान लुडबे, अनिल न्हीवेकर, संतोष गावकर, जॉन नऱ्होना, मोहन चव्हाण, देवेंद्र हडकर, संतोष पालव, मनोज राऊत, प्रसाद आडवणकर आदींनी चर्चेत सहभाग घेतला.






