मालवण (प्रतिनिधी) :
मालवण तालुक्यातील रस्त्यांवरील खड्ड्यांवरून उबाठा शिवसेना आणि सत्ताधारी शिंदे शिवसेना यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच, उबाठा शिवसेनेचे नगरसेवक तपस्वी मयेकर यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली आहे. ‘श्रेयाचे राजकारण न करता विकासकामांच्या गुणवत्तेबाबत उत्तरे द्या,’ असे आव्हान मयेकर यांनी दिले आहे.
मालवण तालुक्यात माजी आमदार वैभव नाईक यांच्या कार्यकाळात रस्त्यांची कामे झाली, हे मान्य आहे. मात्र, ही कामे तत्कालीन पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी आंगणेवाडी यात्रेच्या पार्श्वभूमीवर आगाऊ मंजूर करून घेतली होती आणि या कामांचे कंत्राटदार दत्ता सामंत होते, असा दावा मयेकर यांनी केला. ‘आम्ही नव्हतो, मग त्या रस्त्यांना दोन-तीन वर्षांतच मोठमोठे खड्डे का पडतात?’ असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
मालवण-कुडाळ मार्गावरील खड्डे बुजविण्याचे मोठे श्रेय घेण्यात आले; मात्र आज पुन्हा त्याच रस्त्याची परिस्थिती निर्माण झाली आहे, असे सांगत मयेकर यांनी कामाच्या टिकाऊपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. खड्डे बुजविण्याचा गाजावाजा झाला, मग पुन्हा खड्डे पडल्याचे श्रेय कोण घेणार, असा टोला त्यांनी लगावला.
रस्ते कामांसाठी मंजूर निधी, तांत्रिक मंजुरी, डीपीआर, कंत्राटदारांना घालण्यात आलेल्या अटी-शर्ती आणि प्रत्यक्ष कामाची गुणवत्ता याबाबत जाहीर पत्रकार परिषद घेऊन माहिती द्यावी, असे आव्हान मयेकर यांनी सत्ताधाऱ्यांना दिले.
आमदारांनी कोट्यवधी रुपयांचा निधी आणल्याचे सांगितले जाते; मात्र त्या निधीतून प्रकल्प प्रत्यक्षात आणण्यासाठी आवश्यक तांत्रिक बाबी, योग्य बजेटिंग आणि प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ठोस प्रयत्न होताना दिसत नाहीत, असा आरोपही त्यांनी केला. लोकप्रतिनिधींनी निधी उपलब्ध करून दिल्यानंतर तो योग्य पद्धतीने कार्यान्वित करण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने ठोस नियोजन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
मालवण शहरातील रखडलेल्या विकासकामांवरही मयेकर यांनी टीका केली. भाजी मार्केट आणि स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचा दाखला देत कोट्यवधी रुपये खर्च होऊनही या प्रकल्पांचे केवळ सांगाडे उभे असल्याचा आरोप त्यांनी केला. भुयारी गटार योजना, नवीन नळपाणी योजना आणि कचरा व्यवस्थापन यांसारख्या मूलभूत प्रश्नांवरही त्यांनी प्रशासनाला धारेवर धरले. ‘कागदावरची व्यवस्था आणि प्रत्यक्षातील व्यवस्था यात मोठी तफावत आहे,’ असा आरोप त्यांनी केला.
स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या वेतनातील काही रक्कम रोख स्वरूपात घेतली जात असल्याचा पुरावा आपल्याकडे असल्याचा दावा मयेकर यांनी केला असून, या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे.
‘जे कंत्राटदार तुमचे ऐकतात, तेच काम घेतात. मग क्वालिटी कंट्रोल आणि नियम कुठे जातात?’ असा सवाल करत त्यांनी विकासकामांमध्ये पारदर्शकता आणि गुणवत्तेचे निकष समान असायला हवेत, अशी भूमिका मांडली.
दरम्यान, मालवण शहरातील मोकाट जनावरे, वाढता डासांचा प्रादुर्भाव, फवारणीचा अभाव आणि अपुरी स्वच्छता व्यवस्था याकडेही त्यांनी लक्ष वेधले. जनतेच्या प्रश्नांसाठी पंधरा दिवसांपूर्वी उपोषण करूनही प्रशासनाला नागरिकांच्या समस्यांची दखल घेण्यासाठी वेळ मिळालेला नाही, अशी टीकाही तपस्वी मयेकर यांनी केली.






