माजी विद्यार्थी प्रकाश मेस्त्री यांच्याकडून गुणवंत विद्यार्थ्यांसाठी स्मृतिपुरस्काराची घोषणा
मालवण, दि. : प्रतिनिधी
“पेडणेकर सर आज आपल्यात नाहीत, ही जाणीवच मनाला अस्वस्थ करून जाते. मात्र, त्यांनी दिलेले संस्कार, माणुसकीची शिकवण आणि समाजसेवेचा वारसा आपण पुढे नेला, तर तीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल,” अशा भावनिक शब्दांत प्रकाश पेडणेकर सर यांच्या आठवणींना उजाळा देताना वायंगणी येथे आयोजित श्रद्धांजली सभेत अनेकांचे कंठ दाटून आले. विद्यार्थीप्रिय गुरु, आदर्श शिक्षक, प्रेमळ मित्र आणि सेवाभावी व्यक्तिमत्त्व म्हणून पेडणेकर सरांच्या कार्याला उपस्थितांनी भावपूर्ण आदरांजली वाहिली.
समाज सेवा संघ, वायंगणी भंडारवाडी, मुंबई आणि बौद्ध विकास मंडळ, वायंगणी यांच्या संयुक्त विद्यमाने ठाणेश्वर प्राथमिक शाळेत प्रकाश पेडणेकर सरांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. सरांच्या आठवणींनी भारावलेल्या वातावरणात त्यांच्या कार्याचा आणि व्यक्तिमत्त्वाचा विविध मान्यवरांनी गौरव केला.
पेडणेकर सरांचे परममित्र, आडवली हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक तसेच त्यांचे शाळासोबती सुरेश गावकर यांच्या हस्ते सरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी आपल्या प्रदीर्घ मैत्रीच्या आठवणी जागवताना सुरेश गावकर भावुक झाले. “आमची मैत्री केवळ शाळेपुरती नव्हती; ती आयुष्यभराची होती,” असे सांगताना त्यांनी पेडणेकर सरांसोबतच्या अनेक आठवणी आणि प्रसंग उपस्थितांसमोर मांडले. सुख-दुःखाच्या प्रसंगांमध्ये कायम सोबत राहिलेल्या मित्राच्या आठवणी सांगताना त्यांच्या भावनांचा बांध फुटला. त्यांच्या डोळ्यांत आलेले अश्रू पाहून उपस्थितांचेही डोळे पाणावले.
पेडणेकर सरांच्या दातृत्वशील आणि सेवाभावी वृत्तीचा उल्लेख करताना हिर्लेवाडी सेवा संघाचे अध्यक्ष पांडुरंग वायंगणकर यांनी त्यांच्या माणुसकीच्या कार्याला उजाळा दिला. आपल्या दातृत्वातून आणि माणुसकीच्या कृतीतून प्रकाश पेडणेकर सर कायम स्मरणात राहतील, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
पेडणेकर सरांचे माजी विद्यार्थी तथा उद्योजक प्रकाश मेस्त्री यांनी सरांच्या स्मृती कायम जिवंत ठेवण्यासाठी महत्त्वपूर्ण संकल्प जाहीर केला. दरवर्षी दहावीच्या परीक्षेत गुणवंत ठरणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रकाश पेडणेकर सरांच्या स्मृतिप्रीत्यर्थ पुरस्कार देण्यात येईल, अशी घोषणा त्यांनी केली. या उपक्रमाचे उपस्थितांनी स्वागत केले.
यावेळी रमाकांत नाईक, डॉ. प्रमोद कोळंबकर, कोचरेकर सर, सुगंधा गुरव, प्रतिभा मयेकर आदींनी पेडणेकर सरांच्या आठवणींना उजाळा दिला. प्रत्येकाच्या मनोगतातून सरांबद्दलचा आदर, जिव्हाळा आणि कृतज्ञता व्यक्त होत होती. यावेळी कुबल मॅडम, सुजाता सावंत, उदय दुखंडे, संतोष वायंगणकर, कर, सुधाकर पाकर वायंगणकर, अमृता मांजरेकर, जोशी, हातेकर, बाळू वस्त, रितेश तोडणकर, गुड्डू सारंग, अशोक वायंगणकर, सिद्धेश हळवे आदी उपस्थित होते.
पेडणेकर सरांचे आयुष्य म्हणजे केवळ शिक्षक म्हणून बजावलेली सेवा नव्हे, तर विद्यार्थ्यांवर केलेले संस्कार, गरजूंसाठी केलेली मदत, समाजासाठी केलेले कार्य आणि माणुसकीची जपलेली नाती यांचा सुंदर प्रवास होता. त्यामुळे त्यांच्या निधनाने निर्माण झालेली पोकळी भरून निघणे अशक्य असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
शरीराने पेडणेकर सर आपल्यात नसले, तरी त्यांनी दिलेल्या विचारांचा ‘प्रकाश’ आणि जपलेली माणुसकीची ज्योत पुढील पिढीपर्यंत पोहोचविणे, हाच त्यांच्या स्मृतींना खरा मानाचा मुजरा ठरेल, अशी भावना श्रद्धांजली सभेत व्यक्त झाली.






