शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात जागतिक नेत्रदान पंधरवड्याचे उद्घाटन
सिंधुदुर्गनगरी, दि. २८ : जिमाका
दृष्टीहीन व्यक्तींच्या जीवनात प्रकाश आणण्यासाठी नागरिकांनी नेत्रदानाचा संकल्प करावा, असे आवाहन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, सिंधुदुर्ग येथे करण्यात आले. राष्ट्रीय अंधत्व व दृष्टी क्षीणता नियंत्रण कार्यक्रमांतर्गत दरवर्षी २५ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर या कालावधीत जागतिक नेत्रदान पंधरवडा साजरा केला जातो. त्यानिमित्ताने दि. २७ ऑगस्ट रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात पंधरवड्याच्या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अमोल शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला. यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. शिल्पा नारायणकर, नेत्रशल्यचिकित्सा विभागाचे विभागप्रमुख डॉ. धनंजय भोसले यांचे मार्गदर्शन लाभले. निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. गजानन मोतीफळे यांचीही यावेळी उपस्थिती होती.
कार्यक्रमात उपस्थितांना नेत्रदानाचे महत्त्व, नेत्रदानाची प्रक्रिया तसेच नेत्रदानामुळे दृष्टीहीन व्यक्तींच्या जीवनात होणाऱ्या सकारात्मक बदलाबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. नेत्रदान हे दृष्टीहीनांच्या जीवनात प्रकाश आणणारे कार्य असून, आपल्या पश्चात आपल्या डोळ्यांमुळे एखाद्या व्यक्तीला पुन्हा जग पाहण्याची संधी मिळू शकते, असे यावेळी सांगण्यात आले.
दृष्टी गमावलेल्या व्यक्तींना नेत्रदानामुळे नव्या आयुष्याची आणि उज्ज्वल भविष्याची आशा मिळू शकते. त्यामुळे नागरिकांनी नेत्रदानाबाबत असलेले गैरसमज दूर करून पुढाकार घ्यावा आणि आपल्या पश्चात नेत्रदान करण्याचा संकल्प करावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
‘आपल्या पश्चात आपले डोळे कुणाच्या तरी आयुष्यात प्रकाश आणू शकतात’, या भावनेतून अधिकाधिक नागरिकांनी नेत्रदान चळवळीत सहभागी होण्याचे आवाहन वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय प्रशासनाने केले.






