ग्रामस्थ, लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे; जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांचे आवाहन
सिंधुदुर्गनगरी
‘स्वच्छ गाव – सुंदर गाव – निरोगी गाव’ ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात सोमवारी, दि. ३१ ऑगस्ट २०२६ रोजी विशेष स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन आणि जिल्हा परिषद, सिंधुदुर्ग यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळा, अंगणवाडी, ग्रामपंचायत कार्यालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे तसेच आरोग्य उपकेंद्रांच्या परिसरात हे अभियान आयोजित करण्यात आले आहे.
या अभियानात जिल्ह्यातील ग्रामस्थ, लोकप्रतिनिधी, ग्रामपंचायत पदाधिकारी, अधिकारी-कर्मचारी, शिक्षक, विद्यार्थी, अंगणवाडी सेविका-मदतनीस, आरोग्य कर्मचारी तसेच विविध सामाजिक संस्थांनी मोठ्या संख्येने आणि उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांनी केले आहे.
स्वच्छता ही केवळ शासकीय यंत्रणेची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे. त्यामुळे नागरिकांनी आपल्या गावाचा परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी सक्रिय सहभाग नोंदवावा, असेही त्यांनी म्हटले आहे.
कचरा संकलनापासून जनजागृतीपर्यंत विविध उपक्रम
या विशेष स्वच्छता अभियानात संबंधित शासकीय संस्था आणि त्यांच्या परिसराची स्वच्छता, कचरा संकलन व वर्गीकरण, प्लास्टिक तसेच इतर घनकचऱ्याची योग्य विल्हेवाट, परिसर सुशोभीकरण आणि नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यात येणार आहे.
याशिवाय ओला व सुका कचरा स्वतंत्र करणे, कचरा उघड्यावर न टाकणे, प्लास्टिकचा कमीत कमी वापर करणे आणि सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता राखणे, याबाबतही नागरिकांना प्रोत्साहित करण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींनी या उपक्रमाचे प्रभावी नियोजन करून जास्तीत जास्त नागरिकांचा सहभाग सुनिश्चित करावा. लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांनी स्वतः स्वच्छता अभियानात सहभागी होऊन ग्रामस्थांना स्वच्छतेसाठी प्रेरित करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.
दरम्यान, जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात या कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन करण्याबाबतच्या सूचना सर्व गटविकास अधिकाऱ्यांना पत्राद्वारे देण्यात आल्या आहेत. अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आवश्यक नियोजन करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी दिली.
‘स्वच्छ गाव – सुंदर गाव – निरोगी गाव’ या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेले हे अभियान यशस्वी करण्यासाठी सिंधुदुर्गातील प्रत्येक नागरिकाने सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांनी केले आहे.






