मालवण (प्रतिनिधी) : वायंगणी येथील ज्ञानदीप संस्थेच्या ज्ञानदीप हायस्कूल परिसरात स्वच्छता व देखभाल मोहीम राबविण्यात आली. संस्थेचे अध्यक्ष हनुमंत प्रभू यांनी पुढाकार घेत हा संपूर्ण उपक्रम स्वखर्चाने पूर्ण केला.
शाळेच्या आवारातील जुनाट झाडांच्या मरगळलेल्या फांद्या तसेच बांडगुळे काढण्यात आली. याशिवाय नारळाची झाडे आणि आंबा कलमांच्या सभोवतालची वाढलेली झाडी हटवून परिसर स्वच्छ करण्यात आला. त्यामुळे शाळेच्या आवाराला अधिक मोकळे आणि सुरक्षित स्वरूप प्राप्त झाले आहे.
शाळेच्या इमारतीवर वानर उड्या मारत असल्याने कौले फुटण्याचे प्रकार वारंवार घडत होते. ही बाब लक्षात घेऊन इमारतीच्या लगत असलेल्या झाडांच्या काही किरकोळ फांद्या छाटण्यात आल्या. त्यामुळे इमारतीचे संरक्षण होण्यास मदत झाली असून, फुटलेली कौलेही नव्याने लावून घेण्यात आली.
शाळेच्या परिसराची स्वच्छता, सुरक्षितता आणि इमारतीच्या देखभालीच्या दृष्टीने राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी अधिक सुरक्षित वातावरण निर्माण झाले आहे.
या स्वच्छता व देखभाल कामाच्या वेळी शालेय समितीचे अध्यक्ष बाबू हडकर आणि मुख्याध्यापक टकले उपस्थित होते. संस्थेच्या परिसराची स्वच्छता व शाळेच्या इमारतीचे संरक्षण यासाठी स्वखर्चाने पुढाकार घेतल्याबद्दल उपस्थितांनी संस्थाध्यक्ष हनुमंत प्रभू यांचे आभार मानले.






