मालवण (प्रतिनिधी) : नारळी पौर्णिमेच्या उत्साहाला मालवणच्या पारंपरिक नारळ लढविण्याच्या खेळाची रंगत लाभणार आहे. मालवण बंदर जेटीवर गुरुवार, दि. २७ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता नारळ लढविण्याच्या दोन भव्य स्पर्धांचा महासंगम रंगणार आहे. सतीश आचरेकर मित्रमंडळ आयोजित नारळ लढविणे स्पर्धा तसेच रॉयल ब्रदर्स मित्रमंडळ आयोजित व सतीश आचरेकर पुरस्कृत नारळ लढविणे स्पर्धा एकाच दिवशी, एकाच मंचावर होणार आहेत.
सतीश आचरेकर मित्रमंडळ आयोजित स्पर्धेतील विजेत्यांसाठी यंदा मोठ्या पारितोषिकांची घोषणा करण्यात आली आहे. प्रथम क्रमांकाच्या विजेत्यास तब्बल १ लाख १ हजार १११ रुपये रोख आणि आकर्षक चषक, द्वितीय क्रमांकासाठी ५१ हजार १११ रुपये व चषक, तृतीय क्रमांकासाठी २१ हजार १११ रुपये व चषक, तर चतुर्थ क्रमांकाच्या विजेत्यास ११ हजार १११ रुपये व आकर्षक चषक देऊन गौरविण्यात येणार आहे.
यासोबतच रॉयल ब्रदर्स मित्रमंडळ आयोजित व सतीश आचरेकर पुरस्कृत नारळ लढविणे स्पर्धेतही विजेत्यांसाठी आकर्षक पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. प्रथम क्रमांकासाठी ११ हजार रुपये व आकर्षक चषक, द्वितीय क्रमांकासाठी ५ हजार रुपये व चषक, तर तृतीय आणि चतुर्थ क्रमांकासाठी प्रत्येकी २ हजार २०० रुपये व आकर्षक चषक देण्यात येणार आहे.
मालवणच्या मातीत रुजलेला नारळ लढविण्याचा पारंपरिक खेळ हा केवळ मनोरंजनाचा भाग नसून मालवणी लोकजीवन आणि संस्कृतीचा अविभाज्य घटक आहे. नारळी पौर्णिमेच्या निमित्ताने या पारंपरिक खेळाला मिळणारी ही मोठी व्यासपीठाची जोड यंदाच्या उत्सवाची रंगत आणखी वाढवणार आहे.
एकाच दिवशी दोन स्पर्धा आणि लाखोंच्या पारितोषिकांचे आकर्षण यामुळे मालवण बंदर जेटीवर मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. पारंपरिक खेळाचा थरार अनुभवण्यासाठी तसेच मालवणी संस्कृती आणि उत्सवाचा आनंद घेण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.






