फायरिंग कॉम्पिटिशनमध्ये महाराष्ट्राचे करणार प्रतिनिधित्व
मालवण (प्रतिनिधी) : मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या राष्ट्रीय छात्र सेना (NCC) विभागातील सीनियर अंडर ऑफिसर रूपाली करंगुटकर हिची दिल्ली येथे ३१ ऑगस्ट ते १२ सप्टेंबर २०२६ या कालावधीत होणाऱ्या ऑल इंडिया थलसेना कॅम्प – फायरिंग कॉम्पिटिशनसाठी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्यासाठी निवड झाली आहे.
रूपाली करंगुटकर हिने जून महिन्यापासून सुरू झालेल्या निवड प्रक्रियेत सुमारे साडेतीन हजार विद्यार्थ्यांमधून आपली गुणवत्ता सिद्ध करत सुरुवातीची निवड मिळवली. त्यानंतर ५८ महाराष्ट्र बटालियन, ओरस यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच कोल्हापूर येथे आयोजित विविध प्रशिक्षण आणि निवड शिबिरांमध्ये तिने उल्लेखनीय सहभाग नोंदवला.
या निवड प्रक्रियेत सातत्यपूर्ण कामगिरी करत रूपालीने दिल्लीतील ऑल इंडिया थलसेना कॅम्पमध्ये सहभागी होण्याचा मान मिळवला आहे. या कॅम्पमधील फायरिंग कॉम्पिटिशनमध्ये ती महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहे.
रूपालीच्या या यशामध्ये ५८ महाराष्ट्र बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल अजय राज, लेफ्टनंट कर्नल तनुज मंडलिक तसेच बटालियनमधील इतर आर्मी ऑफिसर्स यांचे मार्गदर्शन लाभले. त्याचबरोबर महाविद्यालयाच्या NCC विभागाचे प्रमुख असोसिएट NCC ऑफिसर लेफ्टनंट प्रा. डॉ. एम. आर. खोत यांचेही तिला सातत्यपूर्ण मार्गदर्शन मिळाले.
रूपालीच्या या उल्लेखनीय यशाबद्दल कृ. सी. देसाई शिक्षण संस्थेचे अध्यक्ष किरण ठाकूर, कार्याध्यक्ष साईनाथ चव्हाण, सेक्रेटरी गणेश कुशे, सहसेक्रेटरी संदेश कोयंडे, कोषाध्यक्ष नंदन देसाई यांच्यासह संस्थेचे संचालक, स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाचे प्राचार्य के. के. राबते, महाविद्यालयाच्या राष्ट्रीय छात्र सेना विभागाचे प्रमुख असोसिएट NCC ऑफिसर लेफ्टनंट प्राध्यापक डॉ. एम. आर. खोत, सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी तिचे अभिनंदन केले. तसेच दिल्लीतील स्पर्धेसाठी तिच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.






