मालवण (प्रतिनिधी) : आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षणासाठी दैनंदिन प्रवासात अडचणी येणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या शैक्षणिक संस्थांमधील १०० गरजू विद्यार्थ्यांना मोफत सायकलींचे वितरण करण्यात आले. आमदार निलेश राणे यांच्या हस्ते हा वितरण सोहळा पार पडला. शिवसेना नवी मुंबई जिल्हाप्रमुख किशोर अशोक पाटकर यांच्या सौजन्याने हा सामाजिक व शैक्षणिक उपक्रम राबविण्यात आला.
कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ, कट्टा संचलित वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, वराडकर इंग्लिश मीडियम स्कूल तसेच डॉ. दादासाहेब वराडकर कला व वाणिज्य महाविद्यालय, कट्टा येथील विद्यार्थ्यांना या उपक्रमाचा लाभ मिळाला.
या उपक्रमासाठी किशोर पाटकर यांच्या सामाजिक दातृत्वासह शिवसेना नवी मुंबई उपशहरप्रमुख महेश (बाबा) परब आणि नरेश गोविंद परब यांचे सहकार्य लाभले. तसेच शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचेही या उपक्रमास सहकार्य मिळाले.
यावेळी बोलताना आमदार निलेश राणे यांनी किशोर पाटकर यांच्या सेवाभावी कार्याचे कौतुक केले. विविध ठिकाणी निःस्वार्थ भावनेने सामाजिक कार्य करणाऱ्या किशोर पाटकर यांनी गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रवास अधिक सुलभ व्हावा, यासाठी सायकली उपलब्ध करून दिल्याचे सांगत हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद असल्याचे त्यांनी नमूद केले.
विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी अशा उपक्रमांची गरज असून, आर्थिक परिस्थितीमुळे कोणत्याही विद्यार्थ्याच्या शिक्षणात अडथळा निर्माण होऊ नये, ही भावना या उपक्रमातून अधोरेखित झाली.
यावेळी संस्थेचे सचिव सुनील नाईक आणि शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी समयोचित मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमास शिवसेना उपनेते संजय आंग्रे, जिल्हा परिषद वित्त व बांधकाम सभापती संतोष साठविलकर, मालवण सभापती प्रज्ञा चव्हाण, संस्था उपाध्यक्ष तथा कट्टा-गुरामवाडचे सरपंच शेखर पेणकर, खजिनदार शाम पावसकर, शालेय समिती अध्यक्ष सुधीर वराडकर, वराडकर इंग्लिश मीडियम स्कूलचे मुख्याध्यापक ऋषिकेश नाईक, डॉ. दादासाहेब वराडकर कला व वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य ध्वजेंद्र मिराशी, वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक महेश भाट, शिवसेना उपजिल्हाप्रमुख दीपा सावंत, विश्वास गावकर, अरविंद करलकर, विधानसभा क्षेत्रप्रमुख बबन शिंदे, युवा सेना जिल्हाप्रमुख संग्राम साळस्कर, तालुकाप्रमुख मंदार लुडबे, सोशल मीडिया प्रमुख किसन मांजरेकर, उपतालुकाप्रमुख भाऊ चव्हाण, विभागप्रमुख राजन माणगावकर, समाजकल्याण माजी सभापती बाळ महाभोज, उपसरपंच आबा कामतेकर, कृषी समिती अध्यक्ष प्रताप चव्हाण, आंबेरी सरपंच मनमोहन डीचोलकर, शेखर फोंडेकर, दया देसाई, समीर रावले, देवेंद्र नाईक, नाना गिरकर यांच्यासह अन्य पदाधिकारी, संस्था पदाधिकारी, शिक्षक, विद्यार्थी व पालक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय पेंडूरकर आणि वीणा मयेकर यांनी केले.
गरजू विद्यार्थ्यांच्या हातात सायकल देत त्यांच्या शिक्षणाच्या वाटेला गती देणारा हा उपक्रम सामाजिक दातृत्व आणि शैक्षणिक बांधिलकीचा सकारात्मक आदर्श ठरला.






