२७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात; गुणवंतांचा सत्कार
मालवण (प्रतिनिधी) : श्री गणेश नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, मालवणची २७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा नगर वाचन मंदिर येथे संस्थापक अध्यक्ष एम. पी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडली. मालवणचे तहसीलदार गणेश लव्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या सभेत पतसंस्थेसाठी स्वमालकीची जागा खरेदी करण्यास सभेने मान्यता दिली.
सभेला अध्यक्ष सुप्रिया गावकर, उपाध्यक्ष विठ्ठल पटकारे, मुख्य कार्यकारी अधिकारी सुचिता धुरी, संचालक पांडुरंग पाटील, प्रताप बागवे, सुनीता सांबरेकर, हेमंत तळवडेकर, संभाजी कोरे, जयश्री हडकर, प्रियंका मसुरकर, हर्षल केळुस्कर आदी उपस्थित होते.
यावेळी स. का. पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य कैलास राबते, डी.एड. कॉलेजचे प्राचार्य दत्तात्रय माळी, भंडारी हायस्कूलचे मुख्याध्यापक रामचंद्र बनसोडे, कुडाळकर हायस्कूलच्या मुख्याध्यापिका नंदिनी साटलकर तसेच कुडाळकर प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका प्राची परब यांचा सत्कार करण्यात आला.
आदर्श कर्जदार म्हणून सुधाकर तुकाराम कासले आणि स्वाती योगेश गव्हाणकर यांचा गौरव करण्यात आला. तसेच संस्थेच्या उत्कृष्ट कार्याबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी सुचिता धुरी, कर्मचारी मोक्षदा धुरी आणि भूषण गावकर यांचाही सत्कार करण्यात आला.
सभेत संस्थेच्या आगामी वाटचालीसह विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. पतसंस्थेसाठी स्वमालकीची जागा खरेदी करण्यास मिळालेली मान्यता हा संस्थेच्या भविष्यातील विस्ताराच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय मानला जात आहे.






