मालवण (प्रतिनिधी) : मालवणी संस्कृती, परंपरा आणि वारसा जपण्याच्या उद्देशाने मालवणी संस्कृती व वारसा मंडळ, मालवण यांच्या वतीने महिलांसाठी भव्य ‘नारळ लढवणे’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवार, दि. २७ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४ वाजता मालवण बंदर जेटी येथील कस्टम ऑफिसशेजारील मेन गेट येथे ही स्पर्धा रंगणार आहे. यंदा स्पर्धेचे ११ वे वर्ष असून विजेत्या महिलांसाठी आकर्षक बक्षिसांची खैरात ठेवण्यात आली आहे.
याबाबतची माहिती मंडळाचे अध्यक्ष अरविंद मोंडकर यांनी मालवण बंदर जेटी येथील हॉटेल राजभोग येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यावेळी मंडळाच्या सल्लागार ॲड. अमृता मोंडकर, सदस्य देवानंद लुडबे, कोळंबच्या सरपंच सिया धुरी, वायरी-भूतनाथच्या उपसरपंच प्राची माणगावकर, आर्या मुणगेकर, शुभदा पाडगावकर, रेश्मा खांदारे, स्नेहल मेथर, रुद्राक्ष कांदळकर, अवनीश मेथर आदी उपस्थित होते.
स्पर्धेतील प्रथम क्रमांकाच्या विजेत्यास फ्रिज, सोन्याची नथ आणि पैठणी, द्वितीय क्रमांकास मिक्सर, सोन्याची नथ व पैठणी, तृतीय क्रमांकास कुकर, चांदीची पैंजण व पैठणी, तर चतुर्थ क्रमांकाच्या विजेत्यास गॅस शेगडी, चांदीची पैंजण व पैठणी देण्यात येणार आहे. याशिवाय प्रथम व द्वितीय क्रमांकाच्या विजेत्यांना आर्या हेल्थ क्लबच्या वतीने प्रत्येकी १० लाख रुपयांचा विमा आणि आयुर्वेदिक स्किन केअर किट देण्यात येणार आहे.
या स्पर्धेत तीन वेळा प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या महिला स्पर्धकासाठी विशेष प्रावीण्य म्हणून ९ ग्रॅम सोन्याचा हार देण्यात येणार आहे. तसेच स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व महिलांना आर्या हेल्थ क्लबच्या माध्यमातून तीन दिवसांची ऑनलाइन मोफत ट्रायल आणि आरोग्यविषयक मोफत मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
स्पर्धा पाहण्यासाठी येणाऱ्या महिलांनाही सहभागी करून घेण्यासाठी सामाजिक संदेश असलेली कुपने देण्यात येणार असून त्यातून लकी ड्रॉ काढला जाणार आहे. लकी ड्रॉमधील विजेत्यांनाही आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत.
दि. २७ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४ वाजता व्यापारी संघाच्या वतीने समुद्राला श्रीफळ अर्पण केल्यानंतर स्पर्धेला सुरुवात होईल. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या महिलांना मंडळाच्या वतीने नारळ मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यावेळी नामवंत नृत्य कलाकारांकडून कोळी नृत्याचे सादरीकरण तसेच जादूगार निखिल यांच्या जादूच्या प्रयोगांचे आयोजन करण्यात आले आहे.
मालवणच्या पारंपरिक संस्कृतीतील हा खेळ नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याबरोबरच महिलांना मोठ्या संख्येने सहभागी करून घेण्याचा मंडळाचा प्रयत्न आहे. या पारंपरिक ‘नारळ लढवणे’ स्पर्धेत महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.






