३५-४० वर्षांची मागणी पुन्हा ऐरणीवर; तळेरे दशक्रोशीतील ग्रामस्थांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन
तळेरे : नव्याने तळेरे तालुक्याची निर्मिती झालीच पाहिजे, या मागणीसाठी तळेरे दशक्रोशीतील जनतेचा लढा आता निर्णायक वळणावर आला आहे. शासन आणि प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी नियोजित तळेरे तालुका निर्मिती कृती समितीच्या वतीने शनिवार, २९ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी ३ वाजता तळेरे येथील स्मित लॉन्स सभागृहात ‘महाएल्गार निर्धार मेळाव्या’चे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात तळेरे तालुका निर्मितीसाठी पुढील आंदोलनाची दिशा निश्चित केली जाणार आहे.
तळेरे तालुका निर्मितीची मागणी आजची नसून गेल्या ३५ ते ४० वर्षांपासून तळेरेवासीय आणि दशक्रोशीतील ग्रामस्थांच्या मनात ही मागणी आहे. यासाठी विविध माध्यमांतून शासनदरबारी सातत्याने पाठपुरावा करण्यात आला आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महसूल मंत्री आणि पालकमंत्री यांना वेळोवेळी निवेदने देण्यात आली असून तळेरे तालुका निर्मितीचा परिपूर्ण प्रस्तावही शासनाकडे सादर करण्यात आल्याचे कृती समितीने म्हटले आहे. मात्र, अद्याप या मागणीला अपेक्षित निर्णय मिळालेला नाही.
दोडामार्ग, वैभववाडीची निर्मिती; तळेरे मात्र वंचित
सिंधुदुर्ग जिल्ह्यात यापूर्वी तळेरेसोबतच दोडामार्ग आणि वैभववाडी या तालुक्यांची निर्मिती करण्याची मागणी पुढे आली होती. दोडामार्ग आणि वैभववाडी तालुके अस्तित्वात आले; मात्र तळेरे तालुका निर्मितीचे स्वप्न अद्याप अपूर्ण राहिले. त्यावेळी राजकीय इच्छाशक्ती कमी पडल्यामुळे तळेरे तालुका घोषित होऊ शकला नाही, अशी भावना कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, काही महिन्यांपूर्वी राज्यात नव्याने निर्माण होणाऱ्या तालुक्यांच्या नावांची घोषणा करण्यात आली. मात्र त्यामध्येही तळेरेचा समावेश नसल्याने तळेरे दशक्रोशीतील ग्रामस्थांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. त्यामुळे आता केवळ निवेदन आणि पाठपुराव्यावर न थांबता जनआंदोलन उभारण्याचा निर्धार कृती समितीने केला आहे.
४५ ते ५० गावांसाठी तळेरे मध्यवर्ती केंद्र
तळेरेचे भौगोलिक आणि व्यापारी महत्त्वही तालुका निर्मितीच्या मागणीमागील प्रमुख आधार मानला जात आहे. मुंबई-गोवा महामार्ग तसेच विजयदुर्ग-कणकवली-कोल्हापूर-पुणे मार्गाच्या दृष्टीने तळेरे हे महत्त्वाचे मध्यवर्ती ठिकाण आहे. ब्रिटिशकालीन ऐतिहासिक बाजारपेठ म्हणूनही तळेरेची स्वतंत्र ओळख आहे.
कणकवली आणि देवगड तालुक्यांच्या परिसरातील तळेरे दशक्रोशीतील किमान ४५ ते ५० गावांसाठी तळेरे हे मध्यवर्ती बाजारपेठेचे ठिकाण ठरते. त्यामुळे प्रशासकीयदृष्ट्या तळेरे येथे स्वतंत्र तालुका निर्माण झाल्यास परिसरातील नागरिकांची शासकीय कामांसाठी होणारी धावपळ कमी होईल, तसेच स्थानिक पातळीवर प्रशासन अधिक सुलभ होईल, असा दावा कृती समितीकडून करण्यात आला आहे.
महाएल्गार मेळाव्यात पुढील दिशा ठरणार
शासनाने तळेरे तालुका निर्मितीची मागणी अद्याप गांभीर्याने घेतलेली नसल्याने आता दशक्रोशीतील जनतेची एकजूट दाखविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. २९ ऑगस्टचा महाएल्गार मेळावा हा केवळ सभा नसून पुढील व्यापक आंदोलनाची दिशा ठरविणारा टप्पा ठरणार आहे. तळेरे तालुका निर्मितीसाठी शासनावर दबाव निर्माण करण्याच्या दृष्टीने या मेळाव्यात विविध निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे.
या मेळाव्यास तळेरे गावातील सामाजिक संस्था, विविध मंडळांचे पदाधिकारी, डॉक्टर, उद्योजक, शिक्षक, विद्यार्थी, व्यापारी, रिक्षा, टेंपो व मॅजिक संघटनांचे प्रतिनिधी, महिला बचतगट, युवक-युवती तसेच सर्व ग्रामस्थांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
तसेच तळेरे दशक्रोशीतील आजी-माजी जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, सरपंच, उपसरपंच, सामाजिक कार्यकर्ते आणि ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन नियोजित तळेरे तालुका निर्मिती कृती समितीचे अध्यक्ष चंद्रकांत ऊर्फ राजू जठार, तळेरेचे सरपंच हनुमंत तळेकर आणि माजी पंचायत समिती सभापती तथा भाजपा कणकवली तालुका मंडळ अध्यक्ष दिलीप तळेकर यांनी केले आहे.
आता निर्णयाची प्रतीक्षा
३५-४० वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागणीला आता जनआंदोलनाचे स्वरूप देण्याची तयारी सुरू झाली आहे. त्यामुळे २९ ऑगस्टचा तळेरे महाएल्गार मेळावा शासनासाठी किती निर्णायक ठरतो आणि तळेरे तालुका निर्मितीच्या मागणीला त्यानंतर कोणते वळण मिळते, याकडे संपूर्ण दशक्रोशीचे लक्ष लागले आहे.






