मालवण (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई आणि जिल्हा विधी सेवा समिती, सिंधुदुर्ग यांच्या निर्देशानुसार मालवण दिवाणी न्यायालयात शनिवार, दि. १२ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. तालुका विधी सेवा समिती आणि तालुका बार असोसिएशन, मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने ही लोकअदालत होणार आहे.
या लोकअदालतीत न्यायालयात प्रलंबित असलेली दिवाणी व फौजदारी प्रकरणे तसेच राष्ट्रीयकृत बँका, सहकारी बँका, स्वायत्त संस्था आणि ग्रामपंचायतींकडील वादपूर्व प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
पक्षकारांनी आपली प्रकरणे तालुका विधी सेवा समिती, मालवणच्या कार्यालयाकडे दाखल करावीत, असे आवाहन करण्यात आले आहे. चर्चेद्वारे आणि परस्पर तडजोडीने प्रकरणे निकाली काढू इच्छिणाऱ्या पक्षकारांनी वादपूर्व चर्चेसाठी न्यायालयात उपस्थित राहावे, असे आवाहन दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) तथा तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष एम. के. फकिह यांनी केले आहे.
लोकअदालतीच्या माध्यमातून न्यायालयीन प्रक्रिया सुलभ आणि जलद पद्धतीने पूर्ण करण्याची संधी पक्षकारांना मिळणार असल्याने संबंधितांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.






