ठाकरे शिवसेनेतर्फे आयोजन; महिलांसाठी स्वतंत्र स्पर्धेचे आकर्षण
मालवण (प्रतिनिधी) : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे पुरस्कृत नारळ लढविणे स्पर्धा मंगळवार, दि. २५ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता आचरा तिठा येथे आयोजित करण्यात आली आहे. यंदा या स्पर्धेचे पाचवे वर्ष असून यावेळी प्रथमच महिलांसाठी स्वतंत्र नारळ लढविणे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
मुख्य स्पर्धेसाठी प्रथम १२८ स्पर्धकांना प्राधान्य देण्यात येणार आहे. विजेत्या स्पर्धकाला ५ हजार १ रुपये आणि चषक, तर उपविजेत्याला ३ हजार १ रुपये आणि चषक देण्यात येणार आहे. प्रथम क्रमांकाचा चषक नगरसेवक मंदार ओरसकर यांच्या वतीने पुरस्कृत करण्यात आला आहे.
महिलांसाठी स्वतंत्र स्पर्धा
यंदाच्या स्पर्धेचे विशेष आकर्षण म्हणजे आचरा विभागातील महिलांसाठी स्वतंत्र स्पर्धा घेण्यात येणार आहे. महिला विभागातील विजेतीला पैठणी, तर द्वितीय क्रमांकाच्या विजेतीला भेटवस्तू देण्यात येणार आहे. पैठणीचे प्रायोजक गजानन गावकर आहेत.
महिला विभागात प्रथम ३२ स्पर्धकांना प्राधान्य देण्यात येणार असून स्पर्धेसाठी लागणारे नारळ महिलांना मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
या दोन्ही स्पर्धांमध्ये जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे. नावनोंदणीसाठी ९१६८१०७०१००८ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.






