मालवण (प्रतिनिधी) : विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि क्रीडा विकासाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने कै. अरुण काशिनाथ बादेकर चॅरिटेबल ट्रस्टतर्फे मालवण येथील भंडारी ए. सो. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाला विविध साहित्य भेट देण्यात आले. यामध्ये १० पंखे, क्रिकेट किट, व्हॉलीबॉल आणि व्हॉलीबॉल नेट यांचा समावेश आहे.
या साहित्यामुळे विद्यार्थ्यांना क्रीडा सरावासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध होणार असून विद्यालयातील शैक्षणिक आणि क्रीडा वातावरण अधिक सुविधायुक्त होण्यास मदत होणार आहे. विद्यार्थ्यांनी उपलब्ध साहित्याचा योग्य वापर करून विविध क्रीडा स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करावी आणि विद्यालयाचे नाव उज्ज्वल करावे, अशी अपेक्षा यावेळी मान्यवरांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाला कै. अरुण काशिनाथ बादेकर चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष गणेश बादेकर, खजिनदार सौगंधराज बादेकर, सदस्य राजीव बादेकर, निनाद बादेकर, श्रीराज बादेकर, दैवज्ञ बादेकर तसेच भंडारी एज्युकेशन सोसायटीचे लोकल कमिटी सेक्रेटरी दशरथ कवटकर, मुख्याध्यापक आर. डी. बनसोडे, प्रा. पवन बांदेकर यांच्यासह शिक्षकवृंद उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. पवन बांदेकर यांनी केले. लोकल कमिटी सेक्रेटरी दशरथ कवटकर यांच्या हस्ते ट्रस्टचे अध्यक्ष गणेश बादेकर यांचा शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. ट्रस्टतर्फे सौगंधराज बादेकर यांनी मनोगत व्यक्त केले.
मुख्याध्यापक आर. डी. बनसोडे यांनी विद्यालयाच्या वतीने ट्रस्टचे आभार मानले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा. दळवी यांनी केले. यावेळी कनिष्ठ महाविद्यालयाचे विद्यार्थी आणि शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.






