मालवण (प्रतिनिधी) : मालवण ग्रामीण रुग्णालयात काही दिवसांपूर्वी नियुक्त करण्यात आलेले स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टर अवघ्या १५ दिवसांतच रुग्णालयात अनुपस्थित असल्याचा आरोप ठाकरे गटाच्या महिला मालवण उपशहरप्रमुख सौ. गौरी सावंत यांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी स्थानिक आमदार निलेश राणे यांच्यावर टीका करत, ‘डॉक्टर पुन्हा सेवेत आणा; अन्यथा स्वागतासाठी दिलेले पुष्पगुच्छ तरी परत आणा,’ असा टोला लगावला आहे.
आमदार निलेश राणे यांच्या विशेष प्रयत्नातून मालवण ग्रामीण रुग्णालयात स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती झाल्याचा दावा करण्यात आला होता. नियुक्तीनंतर राणे समर्थक पदाधिकाऱ्यांकडून संबंधित डॉक्टरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागतही करण्यात आले होते. मात्र, रुजू झाल्यानंतर अवघ्या १५ दिवसांतच संबंधित डॉक्टर रुग्णालयात अनुपस्थित असल्याचा दावा गौरी सावंत यांनी प्रसिद्धीपत्रकातून केला आहे.
महिलांच्या आरोग्यसेवेचा प्रश्न ऐरणीवर
ग्रामीण रुग्णालयात स्त्रीरोगतज्ज्ञ उपलब्ध नसल्याने ग्रामीण भागातून येणाऱ्या महिला रुग्णांसह गर्भवती महिलांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे सावंत यांनी म्हटले आहे. तज्ज्ञ डॉक्टरांची नियमित सेवा उपलब्ध नसल्यास महिलांना उपचारासाठी अन्य ठिकाणी धाव घ्यावी लागते. त्यामुळे ग्रामीण भागातील आरोग्यसेवेचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीर बनल्याचा दावा त्यांनी केला.
‘केवळ डॉक्टरांची नियुक्ती दाखवून स्वागत आणि फोटो काढण्यापुरते राजकारण नको; रुग्णालयात डॉक्टरांची कायमस्वरूपी उपलब्धता सुनिश्चित करणे ही लोकप्रतिनिधींची खरी जबाबदारी आहे,’ अशी टीका सावंत यांनी केली.
‘डॉक्टर आणा किंवा पुष्पगुच्छ परत करा’
आमदार निलेश राणे यांनी संबंधित डॉक्टरांना पुन्हा मालवण ग्रामीण रुग्णालयात सेवेत हजर करून घ्यावे, अशी मागणी सावंत यांनी केली. अन्यथा डॉक्टरांच्या स्वागतासाठी देण्यात आलेले पुष्पगुच्छ तरी परत आणावेत, असा उपरोधिक टोला त्यांनी लगावला.
वैभव नाईक यांच्या कार्यकाळाचा दाखला
आपल्या टीकेच्या समर्थनार्थ गौरी सावंत यांनी माजी आमदार वैभव नाईक यांच्या कार्यकाळाचा दाखला दिला. त्या काळात मालवण ग्रामीण रुग्णालयात पूर्णवेळ उपचार करणारे डॉक्टर उपलब्ध होते आणि नागरिकांना वैद्यकीय सेवा मिळत होती, असा दावा त्यांनी केला.
सध्याच्या लोकप्रतिनिधींच्या निष्काळजीपणामुळे मालवण ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य व्यवस्था ‘व्हेंटिलेटरवर’ गेल्याची टीका सावंत यांनी केली. दरम्यान, संबंधित स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टरांच्या अनुपस्थितीबाबत आरोग्य विभाग किंवा आमदार निलेश राणे यांची अधिकृत भूमिका समोर आलेली नाही. त्यामुळे डॉक्टरांच्या अनुपस्थितीचे नेमके कारण आणि रुग्णालयातील स्त्रीरोगसेवेची सद्यस्थिती याबाबत प्रशासनाचे स्पष्टीकरण महत्त्वाचे ठरणार आहे.






