उपसभापती श्याम झाड यांच्या तत्पर पाठपुराव्याला यश
मालवण (प्रतिनिधी) : वायरी-माणगावकर काजू फॅक्टरी परिसरातील मुख्य मार्गावर पडलेला धोकादायक खड्डा अखेर बुजविण्यात आला आहे. मालवण पंचायत समितीचे उपसभापती घनश्याम (श्याम) झाड यांनी तातडीने दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठपुरावा केल्यानंतर संबंधित विभागाने खड्ड्याची दुरुस्ती केली.
मुख्य मार्गावरील मोठ्या खड्ड्यात पावसाचे पाणी साचत असल्याने वाहनचालक तसेच पादचाऱ्यांना खड्ड्याचा अंदाज येत नव्हता. त्यामुळे या ठिकाणी अपघाताची शक्यता निर्माण झाली होती.
या समस्येची माहिती मिळताच उपसभापती श्याम झाड यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला याबाबत कळवून तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी केली. त्यांच्या पाठपुराव्यानंतर विभागाने कार्यवाही करत खड्डा बुजविला.
या कामावेळी देवानंद लोकेगावकर, मुन्ना झाड, भरत माणगावकर, प्रथमेश डिचवलकर आदी उपस्थित होते. खड्ड्याची दुरुस्ती झाल्याने परिसरातील वाहनचालक आणि पादचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.






