मालवण व्यापारी संघातर्फे माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांचा सत्कार
मालवण (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंबा, काजू, फणस, कोकम यांसारख्या स्थानिक उत्पादनांवर प्रक्रिया करणारे उद्योग उभे राहण्याची गरज आहे. या उत्पादनांचे राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर डिजिटल मार्केटिंग करून स्थानिक उद्योगांना बाजारपेठ उपलब्ध करून द्यावी. अशा उद्योगांना चालना देण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येतील. त्यासाठी जिल्ह्यातील पुढील पिढीला उद्योग-व्यवसायासाठी सक्षम करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री तथा माजी खासदार डॉ. भागवत कराड यांनी केले.
मालवण येथील दैवज्ञ भवन येथे मालवण व्यापारी संघातर्फे डॉ. भागवत कराड यांच्यासोबत संवाद सभा आणि सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री असताना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील व्यापाऱ्यांच्या करविषयक अडचणी सोडविण्यासाठी डॉ. कराड यांनी केलेल्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सत्कार करण्यात आला.
मालवण व्यापारी संघाचे अध्यक्ष उमेश नेरुरकर आणि महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष रामभाऊ भोगले यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू देऊन डॉ. कराड यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी सौ. अंजली कराड, मालवण तालुका व्यापारी संघाचे अध्यक्ष प्रमोद ओरसकर, जिल्हा व्यापारी महासंघाचे उपाध्यक्ष दीपक भोगले, जिल्हा व्यापारी पतसंस्थेचे अध्यक्ष नितीन वाळके, डॉ. सोमवंशी, जिल्हा व्यापारी महासंघाचे माजी अध्यक्ष नितीन तायशेटे यांच्यासह व्यापारी आणि मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना डॉ. कराड यांनी भारताला मजबूत आर्थिक महासत्ता बनविण्याच्या दिशेने देशाची वाटचाल सुरू असल्याचे सांगितले. व्यापार हा या आर्थिक विकासाचा महत्त्वाचा घटक असून सिंधुदुर्गमध्ये पर्यटनासोबतच स्थानिक कृषी उत्पादनांवर आधारित प्रक्रिया उद्योग विकसित होणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
जिल्ह्यातील भूमिपुत्रांच्या उद्योग-व्यवसायाशी संबंधित अडचणी केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून सोडविण्यासाठी आपण प्रयत्न करू, असे आश्वासन डॉ. कराड यांनी दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या सहकार्याने या प्रयत्नांना गती देण्याचे त्यांनी सांगितले.
चिपी विमानतळावरून मुंबई विमानसेवा सुरू करण्यासाठी लवकरच बैठक घेण्याचा प्रयत्न करणार असल्याचेही डॉ. कराड यांनी यावेळी सांगितले. सिंधुदुर्गच्या विकासासाठी नारायण राणे आणि माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्यासारख्या नेतृत्वासोबत आपणही आपल्या परीने योगदान देऊ, असे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी रामभाऊ भोगले यांनी विचार मांडले. नितीन वाळके यांनी प्रास्ताविक केले, तर विजय केनवडेकर यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाला विजय केनवडेकर, सुहास ओरसकर, अभय कदम, गणेश प्रभुलकर, नाना साईल, रविकिरण तोरसकर, प्रसाद पारकर, प्रमोद नलावडे, मधू नलावडे, पी. डी. शिरसाट, द्वारकानाथ घुर्ये, राजन नाईक, अमित भोगले, पूजा वाडकर, आकांक्षा शिरपुटे आदी उपस्थित होते.






