माजी आमदार वैभव नाईक यांचा आमदार निलेश राणेंवर निशाणा; ‘पुन्हा पक्ष बदलणार नाही याची खात्री द्या’ असा टोला
मालवण (प्रतिनिधी) :
“शिंदे शिवसेनेत येण्यासाठी एकनाथ शिंदे मला अनेकवेळा बोलावत होते. मात्र स्वतःवर गद्दारीचा कलंक नको म्हणून मी शिंदे शिवसेनेत गेलो नाही. आमदारकीचे तिकीट मिळवण्यासाठी निलेश राणे यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत शिंदे शिवसेनेत प्रवेश केला आणि आमदार झाले. आता त्यांनी यापुढे पुन्हा पक्ष बदलणार नाही, याची खात्री द्यावी. कारण लवकरच ते भाजपमध्ये प्रवेश करतील,” असा मिश्किल टोला माजी आमदार वैभव नाईक यांनी आमदार निलेश राणे यांना लगावला.
वैभव नाईक म्हणाले की, “मला आमदार व्हायचे असते तर एकनाथ शिंदे यांनी मला अनेकवेळा बोलावले होते. लोकसभा निवडणुकीनंतर शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनीही मला फोन केला होता. ही बाब गोगावलेदेखील मान्य करतात. मात्र मी आमदारकीसाठी पक्ष बदलला नाही.”
निलेश राणे यांच्यावर टीका करताना नाईक म्हणाले, “निलेश राणे आणि त्यांच्या वडिलांना शिवसेनेतून हाकलून देण्यात आले होते. त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल काय वक्तव्य केले होते, हे सर्वांना माहिती आहे. निवडणुकीत आमदारकीचे तिकीट मिळावे म्हणून भाजपला सोडचिठ्ठी देऊन त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. आमदारकीसाठी ते काहीही करू शकत होते. मात्र मी आमदारकीसाठी स्वतःवर गद्दारीचा कलंक लावला नाही. कारण लोक माझ्याकडे अपेक्षेने पाहत होते.”
निलेश राणे यांच्या विजयावरही वैभव नाईक यांनी प्रश्न उपस्थित केला. “खासदार नारायण राणे आणि पालकमंत्री नितेश राणे लोकांच्या घरी फिरले नसते, तसेच रवींद्र चव्हाण यांनी पैसे खर्च केले नसते, तर निलेश राणे निवडून आले नसते. ते कसे निवडून आले, हे निलेश राणे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना माहिती आहे. त्यामुळे आमदारकीच्या दोन वर्षांत त्यांनी काय केले आणि जनतेला काय दिले, हे सांगणे महत्त्वाचे आहे,” असे नाईक म्हणाले.
‘निष्ठेसाठी काहीतरी गमवावे लागते’
“मी निष्ठावंत राहिलो याचा निलेश राणे यांना वारंवार राग येत असेल. मात्र निष्ठावंत राहण्यासाठी काहीतरी गमवावे लागते आणि त्यासाठी मी आमदारकी गमावली आहे. निलेश राणे यांच्यापेक्षा शिंदे गटातील अनेक आमदार त्यावेळी माझे मित्र होते. तेही हीच गोष्ट सांगतात. आजही त्या आमदारांकडून मला शिंदे गटात येण्याचे आवाहन केले जाते,” असेही नाईक यांनी सांगितले.
“मी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत आहे आणि यापुढेही त्यांच्यासोबतच राहणार आहे,” असा पुनरुच्चार वैभव नाईक यांनी केला.
‘भाजपमध्ये जाण्याची शक्यता’
निलेश राणे यांच्या आगामी राजकीय वाटचालीवर भाष्य करताना नाईक म्हणाले, “निलेश राणे यांनी आता पुन्हा पक्ष बदलणार नाही, याची खात्री द्यावी. कारण ते शिंदे शिवसेनेला सोडून भाजपमध्ये प्रवेश करून कुडाळ-मालवणची आमदारकी मिळवतील, असे मला वाटते. त्यामुळे त्यांनी शिंदे शिवसेनेतच राहावे, अशी माझी विनंती आहे.”
वैभव नाईक यांच्या या वक्तव्यामुळे कुडाळ-मालवण मतदारसंघातील राजकीय आरोप-प्रत्यारोपांना पुन्हा धार आली आहे. आगामी काळात निलेश राणे या टीकेला काय प्रत्युत्तर देतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.






