मालवण | विशेष प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराजांच्या सागरी सामर्थ्याचे प्रतीक असलेल्या ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ल्याच्या पूर्वेकडील ढासळलेल्या बुरुजाची भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण (ASI) विभागाने प्रत्यक्ष पाहणी केली आहे. माध्यमांमधून ही बाब समोर आल्यानंतर जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी तातडीने दखल घेत महसूल प्रशासनामार्फत ASI ला पाहणी करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार 19 जुलै रोजी सायंकाळी तज्ज्ञांच्या पथकाने किल्ल्यावर जाऊन सविस्तर तांत्रिक निरीक्षण केले.
भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण, मुंबई मंडळाचे अधीक्षक पुरातत्त्वविद डॉ. अभिजित आंबेकर यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड उपमंडळाचे संरक्षण सहाय्यक संकेत कावलकर, मालवणचे तहसीलदार गणेश लव्हे, देवबागचे ग्राम महसूल अधिकारी वायाळ आणि महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी या पाहणीत सहभाग घेतला.
पथकाने ढासळलेल्या बुरुजाची सद्यस्थिती, तटबंदीची संरचनात्मक स्थिरता, दगडी बांधकामाची गुणवत्ता तसेच समुद्राच्या लाटा, भरती-ओहोटी आणि मुसळधार पावसामुळे झालेल्या परिणामांचा बारकाईने अभ्यास केला. यावेळी आवश्यक तांत्रिक मोजमाप आणि निरीक्षणे नोंदवून संवर्धनासाठी आवश्यक माहिती संकलित करण्यात आली.
या पाहणीनंतर तयार होणारा सविस्तर तांत्रिक अहवाल भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणाच्या मुंबई मंडळाकडे सादर करण्यात येणार आहे. या अहवालाच्या आधारे किल्ल्याच्या संवर्धनासाठी आणि ढासळलेल्या बुरुजाच्या दुरुस्तीसाठी आवश्यक उपाययोजना व पुढील कार्यवाही केली जाणार आहे.
अलीकडील पडझडीमुळे सिंधुदुर्ग किल्ल्याच्या संरक्षणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. महाराष्ट्राच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वैभवाचे प्रतीक असलेल्या या जागतिक दर्जाच्या वारसा स्थळाचे दीर्घकालीन संवर्धन करण्यासाठी शास्त्रीय पद्धतीने दुरुस्ती करणे अत्यावश्यक असल्याचे मतही यानिमित्ताने व्यक्त होत आहे.
ऐतिहासिक वारशाचे जतन ही केवळ शासकीय जबाबदारी नसून समाजाचीही सामूहिक जबाबदारी असल्याने, सिंधुदुर्ग किल्ल्याचे संरक्षण आणि संवर्धनासाठी भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणाकडून लवकरच ठोस पावले उचलली जाण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.







