मालवण (प्रतिनिधी) :
आचरा गाऊडवाडी येथील पूर्ण प्राथमिक शाळेतील पदवीधर शिक्षिकेची अन्य शाळेत करण्यात आलेली कामगिरीवरील नियुक्ती रद्द करून त्यांना तात्काळ मूळ शाळेत रुजू करावे, अशी आक्रमक मागणी आचरा येथील लोकप्रतिनिधी, पालक आणि ग्रामस्थांनी मालवण पंचायत समिती प्रशासनाकडे केली आहे. शिक्षिकेअभावी विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत असून त्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
यासंदर्भात लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने पंचायत समितीचे उपसभापती घनश्याम झाड यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन साद केले. ‘ग्राम विकास मंडळ आचरे-गाऊडवाडी पंचक्रोशी, मुंबई’ यांच्या माध्यमातून हे निवेदन देण्यात आले.
या शाळेत इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतचे वर्ग सुरू आहेत. यापूर्वी शाळेत दोन उपशिक्षक आणि एक पदवीधर शिक्षक कार्यरत होते. मागील शैक्षणिक वर्षात इयत्ता सातवीचा वर्ग नसल्याचे कारण देत येथील पदवीधर शिक्षिकेला अन्य शाळेत कामगिरीवर पाठविण्यात आले होते. मात्र, सध्याच्या शैक्षणिक वर्षात इयत्ता सहावी आणि सातवीचे वर्ग पुन्हा पूर्ण क्षमतेने सुरू झाले आहेत. असे असतानाही संबंधित पदवीधर शिक्षिकेला अद्याप मूळ शाळेत परत पाठविण्यात आलेले नाही.
शाळेतील विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार शिक्षकांची आवश्यकता असताना पदवीधर शिक्षिकेची अन्यत्र नियुक्ती कायम ठेवल्यामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर आणि शैक्षणिक गुणवत्तेवर प्रतिकूल परिणाम होत असल्याचा दावा पालक आणि ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे संबंधित शिक्षिकेला तात्काळ मूळ शाळेत रुजू करण्याची मागणी करण्यात आली.
निवेदन स्वीकारल्यानंतर उपसभापती घनश्याम झाड यांनी तात्काळ शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलावून या प्रश्नाबाबत सविस्तर माहिती घेतली. “कोणत्याही परिस्थितीत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ दिले जाणार नाही,” असे झाड यांनी स्पष्ट केले. तसेच सभापती, गटविकास अधिकारी आणि गटशिक्षणाधिकारी यांच्याशी सविस्तर चर्चा करून या प्रश्नावर लवकरच सकारात्मक निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही त्यांनी पालक आणि ग्रामस्थांना दिली.
यावेळी आचरा सरपंच जेरोन फर्नांडिस, खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष राजन गावकर, जाकारिएस फर्नांडिस, चंदन पांगे, जयंत पांगे, सुनील पेडणेकर यांच्यासह शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.






