मालवण (प्रतिनिधी) :
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा लक्षात घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून तालुक्यातील विविध शाळांमध्ये वह्यावाटपाचे विशेष अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत ओझर विद्यामंदिर, कांदळगाव प्रशालेत मनसेतर्फे वह्यावाटप कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सिंधुदुर्ग उपजिल्हाध्यक्ष गणेश वाईरकर, तालुकाध्यक्ष गॅरी अन्ननसिएशन आणि शहराध्यक्ष सागर जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.
पक्षाच्या सामाजिक उपक्रमाला जोड देत तालुकाध्यक्ष गॅरी अन्ननसिएशन यांनी यावेळी तीन गरजू विद्यार्थिनींना दप्तर, कंपास पेटी तसेच अन्य शालेय साहित्याचे वाटप केले. एवढेच नव्हे, तर या तिन्ही विद्यार्थिनींचा संपूर्ण वर्षाचा शैक्षणिक खर्च स्वतः उचलण्याची घोषणा त्यांनी केली. त्यांच्या या निर्णयाचे उपस्थितांनी कौतुक केले.
विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेत प्रशालेसाठी अन्ननसिएशन यांनी स्वखर्चाने वॉटर प्युरीफायर भेट दिला. त्यामुळे विद्यार्थ्यांना शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.
यावेळी शालेय समिती अध्यक्ष किशोर नरे, प्रभारी मुख्याध्यापक डी. डी. जाधव, सहाय्यक शिक्षक सावंत, पी. के. राणे, प्रवीण पारकर, अभय शेर्लेकर, शिक्षिका सोनाली कोदे-तळाशीलकर, हर्षाली कांदळगावकर, शालेय कर्मचारी दादा परुळेकर, खोडके यांच्यासह सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा ओळखून मनसेच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या या सामाजिक अभियानाचे विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांकडून स्वागत करण्यात आले. गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्याबरोबरच त्यांच्या शिक्षणाचा खर्च उचलण्याच्या उपक्रमामुळे सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडत असल्याच्या भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या.






