शिवशंभो विचार मंचचे सहसंयोजक भूषण साटम यांचे प्रतिपादन; कट्टा येथे क्रांती दिनानिमित्त मार्गदर्शन व्याख्यान
मालवण, दि. प्रतिनिधी : ब्रिटिशांच्या जुलमी शृंखलेत जखडलेल्या भारतमातेला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी असंख्य क्रांतिकारकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. या क्रांतिकारकांनी संघटन, कठोर राष्ट्रप्रेम, एकात्मता, शिस्तपालन, वज्रनिश्चय तसेच गुरुजन, संस्कृती आणि धर्माबद्दलचा अभिमान हे गुण आपल्या आचरणातून समाजासमोर ठेवले. मात्र, आजच्या काळात हे गुण लोप पावताना दिसत आहेत. भारत देश पुन्हा सुजलाम्-सुफलाम् बनवायचा असेल, तर क्रांतिकारकांनी आचरणात आणलेले गुण प्रत्येकाने आपल्या जीवनात रुजवले पाहिजेत, असे प्रतिपादन श्री शिवराज मंचचे अध्यक्ष तथा शिवशंभो विचार मंच कोकण प्रांतचे सहसंयोजक, इतिहास अभ्यासक भूषण साटम यांनी केले.
कट्टा येथील वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, कट्टा, मालवण येथे क्रांती दिनानिमित्त विद्यार्थ्यांना स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतिकारकांच्या बलिदानाची जाणीव व्हावी, या उद्देशाने ‘भारतीय स्वातंत्र्यलढ्यामध्ये क्रांतिकारकांचे योगदान’ या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी साटम बोलत होते.
कार्यक्रमाच्या व्यासपीठावर कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव सुनील नाईक, कट्टा केंद्रप्रमुख गौरव नाईक, मुख्याध्यापिका देवयानी गावडे, पालक-शिक्षक संघाचे सदस्य गणेश वाईरकर, समाजशास्त्र विभागप्रमुख एकनाथ राऊळ तसेच सहाय्यक शिक्षक किसन हडलगेकर आदी उपस्थित होते.
क्रांतिकारकांच्या बलिदानाचे स्मरण विद्यार्थ्यांचे कर्तव्य
मार्गदर्शन करताना भूषण साटम म्हणाले की, “आजचे स्वातंत्र्य आपल्याला तयार स्वरूपात मिळाले आहे. मात्र, हे स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ज्या क्रांतिकारकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली, त्यांच्या त्यागाचे स्मरण करणे हे प्रत्येक विद्यार्थ्याचे आद्य कर्तव्य आहे.”
स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतिकारकांच्या योगदानाचा आढावा घेताना त्यांनी भगतसिंग, मदनलाल धिंग्रा, खुदीराम बोस, अनंत कान्हेरे, वासुदेव बळवंत फडके, क्रांतिसिंह नाना पाटील, नेताजी सुभाषचंद्र बोस, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, बंगालमधील शांती घोष व सुनीती चौधरी यांच्यासह अनेक क्रांतिकारकांच्या त्यागाचा उल्लेख केला.
तसेच ईशान्य भारतातील राणी गड्डम्मा यांच्या योगदानाची माहिती देत त्यांनी स्वातंत्र्यलढ्यात अनेक ज्ञात-अज्ञात क्रांतिकारकांनी दिलेल्या योगदानाचे स्मरण केले. स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या अनेकांची नावे आजही सर्वसामान्यांना ज्ञात नाहीत, असेही त्यांनी सांगितले.
विद्यार्थीदशेतूनच नव्या क्रांतीची सुरुवात
आज देशाला पुन्हा एका सकारात्मक परिवर्तनाची गरज आहे. ही परिवर्तनाची सुरुवात विद्यार्थीदशेतूनच झाली पाहिजे. विद्यार्थी हा देशाच्या भवितव्याचा केंद्रबिंदू असून, देशाच्या सर्वांगीण विकासात त्याचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे, असे साटम यांनी सांगितले.
राष्ट्रप्रेम, शिस्त, संघटनशक्ती, सामाजिक बांधिलकी, आत्मविश्वास आणि वज्रनिश्चय या गुणांचा विद्यार्थ्यांनी अंगीकार करावा, असे आवाहनही त्यांनी केले.
विद्यार्थ्यांसाठी वेशभूषा स्पर्धा
क्रांती दिनाच्या कार्यक्रमानिमित्त इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी वेशभूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी विविध स्वातंत्र्यसैनिक आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वांच्या वेशभूषा साकारून त्यांच्या कार्याची ओळख करून दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समाजशास्त्र विभागप्रमुख एकनाथ राऊळ यांनी केले. सहाय्यक शिक्षक किसन हडलगेकर यांनी उपस्थितांचे आभार मानले. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला.






