जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त वडाचापाट हायस्कूलमध्ये छायाचित्र प्रदर्शन; २६ विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
मालवण, दि. प्रतिनिधी : छायाचित्रण ही केवळ एक कला नसून त्यामागे विज्ञानही आहे. आधुनिक तंत्रज्ञानामुळे छायाचित्रण क्षेत्राचा मोठ्या प्रमाणात विस्तार झाला असून फॅशन व मॉडेल फोटोग्राफी, वाइल्डलाईफ व नेचर फोटोग्राफी, जर्नालिझम व डॉक्युमेंटरी, प्रॉडक्ट व अॅड फोटोग्राफी, फाईन आर्ट तसेच एरियल व ड्रोन फोटोग्राफी अशा विविध क्षेत्रांत करिअरच्या उत्तम संधी उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांनी या संधींचा करिअरच्या दृष्टीने उपयोग करून घ्यावा, असे प्रतिपादन श्री देवी शांतादुर्गा हायस्कूल, वडाचापाटचे मुख्याध्यापक प्रसाद कुबल यांनी केले.
भंडारी एज्युकेशन सोसायटी (मालवण) मुंबई संचलित श्री देवी शांतादुर्गा हायस्कूल, वडाचापाट येथे ‘जागतिक छायाचित्रण दिन’ विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. त्यावेळी मुख्याध्यापक प्रसाद कुबल बोलत होते.
मोबाईलमधून टिपलेल्या छायाचित्रांचे प्रदर्शन
जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात टिपलेल्या उत्कृष्ट छायाचित्रांचे भव्य प्रदर्शन प्रशालेच्या कला दालनात भरवण्यात आले होते. या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. एकूण २६ विद्यार्थ्यांनी छायाचित्रण स्पर्धेत सहभाग नोंदवला.
छायाचित्रण कलेचा इतिहास, समाजातील त्याचे महत्त्व तसेच निसर्ग आणि संस्कृतीचे जतन याबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करणे हा प्रदर्शनामागील प्रमुख उद्देश होता. त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या निरीक्षणशक्तीला आणि सर्जनशीलतेला वाव मिळावा, यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
आर्या भांडे प्रथम
प्रदर्शनातील छायाचित्रांचे परीक्षण शिक्षिका वेदिका दळवी आणि प्रतिभा केळुसकर यांनी केले. स्पर्धेत आर्या रामचंद्र भांडे हिने प्रथम क्रमांक, निधी निनाद धारपवार हिने द्वितीय क्रमांक, तर सिया सचिन पाताडे हिने तृतीय क्रमांक मिळविला.
उत्तेजनार्थ पारितोषिकासाठी सिद्धी भरत पालव, नेहा नामदेव वरक आणि श्रवण महेश सावंत यांची निवड करण्यात आली. गुणवंत विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले.
विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला व्यासपीठ
या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी आपल्या आजूबाजूच्या परिसरातील निसर्ग, मानवी जीवन, संस्कृती आणि विविध घटनांकडे पाहण्याची वेगळी दृष्टी सादर केली. मोबाईलच्या माध्यमातून सहज उपलब्ध असलेल्या तंत्रज्ञानाचा सर्जनशील वापर करून विद्यार्थ्यांनी उत्तम छायाचित्रे टिपली.
छायाचित्रण क्षेत्रातील वाढत्या संधींच्या पार्श्वभूमीवर अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये या क्षेत्राविषयीची आवड निर्माण होण्यास आणि त्यांना भविष्यातील करिअरच्या पर्यायांची ओळख होण्यास मदत होईल, असेही यावेळी सांगण्यात आले.
या उपक्रमाबद्दल प्रशालेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद तसेच पालकांनी सर्व सहभागी आणि विजेत्या विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले.






