सिंधुदुर्गातून ३६ विद्यार्थिनींची नोंदणी; काँग्रेस जिल्हाध्यक्ष अरविंद मोंडकर यांचे आवाहन
मालवण, दि. प्रतिनिधी : देशातील युवा विद्यार्थिनींना भेडसावणाऱ्या शैक्षणिक, आर्थिक, बेरोजगारी आणि सामाजिक समानतेशी संबंधित प्रश्नांवर थेट संवाद साधण्यासाठी काँग्रेसचे युवा नेते तथा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी पुणे दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आलेल्या ‘छात्रों की गूंज’ या विशेष संवाद कार्यक्रमात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थिनींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद मोंडकर यांनी केले आहे.
या कार्यक्रमासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून आतापर्यंत ३६ विद्यार्थिनींनी नोंदणी पूर्ण केली असल्याची माहिती अरविंद मोंडकर यांनी दिली.
२२ ऑगस्टला पुण्यात कार्यक्रम
‘छात्रों की गूंज’ हा मार्गदर्शन आणि संवाद कार्यक्रम २२ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता पुण्यातील आर. टी. ओ. मेट्रो स्टेशनजवळील एआयएसएसएमएस इंजिनिअरिंग कॉलेज ग्राउंड, गेट क्रमांक १ येथे आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमात विद्यार्थिनींना शिक्षण, रोजगार, करिअर आणि सामाजिक समानतेशी संबंधित विविध प्रश्नांवर थेट संवाद साधण्याची संधी मिळणार आहे.
शिक्षणापासून रोजगारापर्यंतच्या प्रश्नांवर संवाद
आजच्या काळात शिक्षण घेत असताना विद्यार्थिनींना अनेक आर्थिक आणि सामाजिक आव्हानांचा सामना करावा लागतो. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर उपलब्ध होणाऱ्या रोजगाराच्या संधी, करिअरची दिशा, बेरोजगारीची परिस्थिती आणि सामाजिक समानतेचे अधिकार यांसारख्या विषयांवर राहुल गांधी विद्यार्थिनींशी संवाद साधणार असल्याचे काँग्रेसच्या वतीने सांगण्यात आले.
विद्यार्थिनींना भेडसावणाऱ्या समस्या मांडण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे, त्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे तसेच भविष्यातील करिअर आणि रोजगाराच्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी मार्गदर्शन करणे, हा या संवादाचा उद्देश असल्याचे मोंडकर यांनी सांगितले.
सिंधुदुर्गातील विद्यार्थिनींमध्ये उत्साह
या संवाद कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थिनींमध्ये उत्साहाचे वातावरण असून आतापर्यंत ३६ विद्यार्थिनींनी नोंदणी केली आहे. अद्याप ज्या विद्यार्थिनींना या कार्यक्रमात सहभागी व्हायचे आहे, त्यांनी उपलब्ध क्यूआर कोड स्कॅन करून ‘छात्रों की गूंज’ उपक्रमांतर्गत आपली नोंदणी पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाबाबत अधिक माहिती आणि संपर्कासाठी ९८९२०५५८२० या क्रमांकावर संपर्क साधावा, असेही काँग्रेस जिल्हाध्यक्ष अरविंद मोंडकर यांनी सांगितले.
विद्यार्थिनींच्या शैक्षणिक, सामाजिक आणि रोजगारविषयक प्रश्नांना व्यासपीठ मिळवून देणाऱ्या या कार्यक्रमात सिंधुदुर्गातून अधिकाधिक विद्यार्थिनींनी सहभागी व्हावे, असे आवाहन काँग्रेसच्या वतीने करण्यात आले आहे.






