कुडाळ : श्री जगन्नाथ संगीत विद्यालय, कुडाळ आणि अष्टपैलू कलानिकेतन, मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, २३ ऑगस्ट २०२६ रोजी कुडाळ येथील श्री भैरव-जोगेश्वरी मंदिरात ‘गुरुवंदना सोहळा २०२६’ आयोजित करण्यात आला आहे. सकाळी ७.३० ते रात्री ९ वाजेपर्यंत दिवसभर चालणाऱ्या या संगीतमय सोहळ्यात गायन, हार्मोनियम, तबला आणि पखवाज वादनाच्या विविध मैफिली रंगणार आहेत.
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ७.३० वाजता देवता पूजन, दीपप्रज्वलन आणि उद्घाटनाने होणार आहे. यावेळी कुडाळ-मालवणचे आमदार निलेश राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख तथा उद्योजक दत्ता सामंत, भैरव-जोगेश्वरी मंदिराचे अध्यक्ष डॉ. शंकर राऊळ, उपाध्यक्ष शरद मेस्त्री, ज्येष्ठ भजनी कलाकार परशुराम (प्रभाकर) मेस्त्री, पंचायत समिती उपसभापती सिताराम तेली, जिल्हा परिषद सदस्य रुपेश पावसकर आणि नगरसेविका नयना मांजरेकर आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
सकाळी ९ ते १०.३० या वेळेत संगीत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे गायन होणार आहे. त्यानंतर सकाळी १०.३० वाजता स्वप्नील केळुसकर आणि अक्षय सातार्डेकर यांचे राग गुजरी तोडीमधील हार्मोनियम सोलोवादन होईल. त्यांना पखवाजवर वैभव मांजरेकर साथ करणार आहेत.
सकाळी ११ ते दुपारी १२.३० या वेळेत धनंजय सावंत (तबला अलंकार) यांच्या विद्यार्थ्यांचे तबला सोलोवादन तसेच विद्यार्थ्यांचे गायन सादर केले जाणार आहे. त्यानंतर महेश सावंत (पखवाज अलंकार) यांच्या विद्यार्थ्यांचे सामूहिक पखवाज सोलोवादन रंगणार आहे. दुपारी १.३० ते ३ या वेळेत स्नेहभोजनासाठी मध्यांतर असेल.
दुपारी ३ ते ६ या वेळेत गुरुपूजन आणि उपस्थित अतिथी कलाकारांचे गायन होणार आहे. तर सायंकाळी ६ वाजता ‘नांदी ते भैरवी’ या विशेष संगीत रजनीचे आयोजन करण्यात आले आहे.
या संगीत रजनीचे प्रमुख आकर्षण गोव्याचे सुप्रसिद्ध गायक ओंकार चारी यांचे गायन असणार आहे. त्यांना ऑर्गनवर गुरुवर्य भालचंद्र केळुसकर बुवा, तबल्यावर प्रसाद मेस्त्री आणि पखवाजवर विशाल केळुसकर संगीतसाथ करणार आहेत.
गुरु-शिष्य परंपरेचा गौरव करण्याबरोबरच संगीताच्या विविध प्रकारांची अनुभूती देणाऱ्या या दिवसभराच्या सोहळ्यात संगीतप्रेमी आणि भाविकांसाठी सुरेल मैफिलींची पर्वणी उपलब्ध होणार आहे. या संपूर्ण कार्यक्रमाचा लाभ संगीतप्रेमी व भाविकांनी मोठ्या संख्येने घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.







