मालवण (प्रतिनिधी) : पारंपरिक खेळाला आधुनिक स्पर्धेची रंगत देत केदार झाड मित्र मंडळाच्या वतीने वायरी येथे भव्य ‘नारळ लढविणे स्पर्धा २०२६’ आयोजित करण्यात आली आहे. बुधवार, १९ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता भूतनाथ मंदिराजवळ ही स्पर्धा रंगणार आहे.
या स्पर्धेतील प्रथम क्रमांकाच्या विजेत्यास ११ हजार १११ रुपये, तर द्वितीय क्रमांकाच्या विजेत्यास ७ हजार ७७७ रुपये रोख पारितोषिक देण्यात येणार आहे. तसेच उपांत्य फेरीत पराभूत होणाऱ्या दोन स्पर्धकांना प्रत्येकी २ हजार रुपये पारितोषिक देण्यात येणार आहे.
नारळ लढविण्याच्या पारंपरिक खेळाला प्रोत्साहन देण्याबरोबरच स्थानिक युवकांना एकत्र आणणे आणि मनोरंजनाच्या माध्यमातून कोकणातील पारंपरिक संस्कृतीचे जतन करणे, हा या उपक्रमाचा उद्देश आहे.
या पारंपरिक खेळाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळावा, यासाठी जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावे आणि रसिकांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून स्पर्धेचा आनंद घ्यावा, असे आवाहन केदार झाड मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.






